'आवाज केला तर तुला...'; मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी केली चोरी, दागिन्यांसह रक्कमही लंपास
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील पुष्पनगर येथील सराफी दुकानात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरी केली. सोने-चांदीचे दागिने व रोख असा एकूण ८७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना पहाटे उघडकीस आली. याबाबतची फिर्याद आशिष अरविंद होगाडे (वय ३४, रा. पुष्पनगर) यांनी भुदरगड पोलिसांत दिली आहे. त्यानुसार, आता पोलिसांकडून तपास केला जात आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, आशिष होगाडे यांचे गावातच सराफ दुकान आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सराफी दुकानाचे तसेच शेजारील गोडाउनचे शटर फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने, मूर्ती, बार, अंगठ्या, बाळगोटे, कडदोरे, नथ अशा विविध वस्तूंसह ८७ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
गाळा मालक शामराव रावजी बाबर यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करून चोर जात असताना आशिष होगाडे यांना आवाज आल्याने ते तिकडे गेले. त्यावेळी सुमारे आठ चोरटे चोरी करताना दिसले. ते पुढे जात असताना त्यातील एका चोरट्याने ‘आवाज केला तर तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. पण होगाडे यांनी आरडाओरड केल्याने अज्ञात चोरटे पळून गेले.
हेदेखील वाचा : परभणीच्या कुंभार पिंपळगाव येथील ज्वेलर्समध्येच चोरी; तब्बल 20 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच भुदरगड पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शहाबाज शेख करत आहेत.
परभणीतही चोरीची घटना
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. घरफोडी, चोरीच्या घटनाही वाढत आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी कुंभार पिंपळगाव येथील बसस्टँड रोडवरील ज्ञानेश्वर ज्वेलर्स या सोने-चांदीच्या दुकानात चोरी झाली. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून 20 लाख रुपयांच्या सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली.
हेदेखील वाचा : पुण्यात वाहनचोर मोकाटच, नागरिक त्रस्त; दोन दिवसांत तब्बल 25 वाहनांची चोरी