संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरातील घरफोड्या, सोनसाखळी चोरट्यासोबतच वाहनचोर देखील सुसाट सुटले आहेत. अवघ्या दोन दिवसांत शहरातून तब्बल २५ वाहन चोरीच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे, मध्यवर्ती भाग असलेल्या खडक, फरासखाना परिसरासह येरवडा, चंदननगर, आंबेगाव, वाघोली, लोणी काळभोर येथून या वाहनाची चोरी झाली आहे. सार्वजनिक रस्ते असो वा खासगी ठिकाणे अश्या सर्वच ठिकाणी वाहनचोर सक्रिय असल्याने पुणेकर हैराण झाले आहेत.
याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलिस लक्ष देत आहेत. दुसरीकडे मात्र शहरात सराईत चोरांनी उच्छाद घातल्याचे चित्र आहे. घराजवळ, सोसायटीच्या किंवा कार्यालयाच्या बाहेर तसेच सार्वजनिक रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्या चोरीला जात आहेत. काही क्षणातच हे चोरटे गाडी लॉक केलेली असताना पळवून नेत आहेत. यामुळे खर्या अर्थाने वाहन चोर्या रोखण्याचे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे.
गेल्या दोन दिवसांत पुणे पोलिसांत वाहनचोरीचे तब्बल २५ गुन्हे दाखल झाले आहेत. यात तीन रिक्षांचा समावेश आहे. खडक परिसरातील चिमण्या गणपती मंडळाजवळून दुचाकी चोरी गेली. याबाबत ६५ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तर, पेठेतील जोगेश्वरी मंदिर शेजारील लेनमधून दुचाकी चोरीप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल आहे. तिसऱ्या घटनेत कसबा पेठेतील माणिकचौक येथून रिक्षा चोरीला गेली. याबाबत फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या भागासह आंबेगाव भागातील ज्ञानेश्वर बिल्डिंग पार्किंग व हडपसर येथील चिंतामणीनगर भागात रिक्षा चोरीची घटना घडली. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. याशिवाय भारती विद्यापीठ, खराडी, विश्रांतवाडी, चतुःश्रृंगी, बाणेर भागात वाहनचोरीच्या घटना घडल्या आहेत.
चोरीच्या घटनेतील वाहने अद्याप शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही. मात्र, महागडी वाहने चोरी जात असल्याने सर्व सामान्य नागिरकांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागतो आहे.
विसर्जनाच्या गर्दीत वाहनचोरांचा धुमाकुळ
गेल्या दोन दिवसांत दाखल झालेल्या २५ गुन्ह्यांपैकी जवळपास निम्मे गुन्हे हे शहराच्या मध्यवर्ती भागातील विश्रामबाग, फरासखाना आणि खडक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडले आहेत. शहरात ६ व ७ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक झाली. त्यात विशेषतः ६ सप्टेंबर रोजी मध्यवर्ती भागात प्रचंड गर्दी होती. याच गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी वाहनांवर डल्ला मारला. आलेल्या नागरिकांनी वाहने रस्त्याच्या कडेला तसेच गल्यामध्ये पार्क केलेली होती. त्यामुळे चोरट्यांसाठी ही अधिक चांगली संधी मिळाली. त्यातून मोठ्या प्रमाणात वाहने चोरीला गेली.
पथकांकडून निराशा
पुणे शहरातून वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण मोठे आहे. मात्र तुलनेत पोलिसांना चोरीला गेलेल्या वाहनांचा छडा लावण्यात यश येत नाही. स्थानिक पोलिस व वाहन चोरी विरोधी पथके नेमकी करतात काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. वाहन चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वाहनचोरी विरोधी दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. मात्र, त्यांच्याकडून पुरती निराशा होत आहे.