सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पीएमपी बस तसेच बस स्थानके आणि गर्दीत प्रवाशांकडील ऐवज लांबविणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून, स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये साडे तीन लाखांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. पहिल्या घटनेत दोन तरुणांच्या गळ्यातील ६० हजार रुपयांच्या सोन साखळी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात २१ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार तरुण वाकडेवाडी परिसरात राहण्यास आहे. तो व त्याचा एक मित्र सांगलीला जाण्यासाठी बस स्थानकात आले होते. सांगलीच्या बस आल्यानंतर ते धावत गेले व बसमध्ये चढत असताना गर्दीत अज्ञात चोरट्याने दोघांच्या गळ्यातील सोन साखळी चोरून नेल्या. काही वेळानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला.
दुसऱ्या घटनेत २६ वर्षीय तरुण मुंबई ते पुणे शिवनेरी बसने प्रवास करत होता. बसमध्ये त्याने त्याची सॅक रॅकमध्ये ठेवली होती. सॅकमध्ये लॅपटॉप, आयपॅड तसेच कागदपत्रे होती. तक्रारदार तरुण स्वारगेट परिसरात आल्यानंतर शेवटच्या स्टॉपला उतरत असताना त्याने सॅक पाहिली असता सॅक नसल्याचे दिसून आले. शोध घेऊनही सॅक न सापडल्याने तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरट्याने सॅक व त्यामधील २ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अशोक पाटील करत आहेत.
पुण्यात नागरिकांना लुटले
पुणे शहरात एकट्या पादचारी नागरिकांना भावनिक करून त्यांना लुटण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुन्हा दोन घटना घडल्या असून, एका ज्येष्ठ महिलेसह दोघांजवळील किंमती ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. सिंहगड रस्ता आणि कोंढवा भागात या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात ६२ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार या गणेशमळा परिसरात राहायला आहेत. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती मंदिर परिसरातून त्या जात होत्या. त्यावेळी दोन चोरटे त्यांच्याजवळ आले. महिलांना मोफत साडी आणि पैशांचे वाटप करण्यात येत असल्याची बतावणी केली. तुमच्याकडील दागिने आणि रोकड काढून पिशवीत ठेवा, असे सांगितले. नंतर चोरट्यांनी महिलेला बोलण्यात गुंतवत त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून पिशवीतील दागिने आणि रोकड असा ५५ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.