संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. दररोज चोरटे वेगवेगळे आमिष दाखवून नागरिकांच्या पैशावर डल्ला मारत आहेत. फसवणुकीच्या घटनांना बळी नपडण्याचे आवाहन वेळोवेळी पोलिसांकडून केले जात आहे मात्र फसवणुकीच्या घटना थांबताना दिसून येत नाही. अशातच आता पुण्यातून एक घटना समोर आली आहे. केक, तसेच बेकरी माल उत्पादक नामाकिंत कंपनीची वितरण एजन्सी सुरू करण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची ६ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ३६ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.
तक्रारदार तरुण मांजरी भागात राहतो. त्याला केक विक्रीचे दुकान सुरू करायचे होते. याबाबत त्याने ऑनलाईन काही केक तसेच बेकरी उत्पादकांची माहिती घेतली. त्यावर दिलेले संपर्क घेतले व त्यांच्याशी संपर्क साधला. नंतर त्याला चोरट्यांनी संपर्क साधला. वितरण एजन्सी देण्याचे आमिष दाखविले. तरुणाला ऑनलाइन पद्धतीने पैसे भरण्यास सांगितले. त्याने खात्यात वेळोवेळी ६ लाख १५ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर तरुणाने सायबर चोरट्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. तेव्हा चोरट्यांचा मोबाइल बंद होता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यनंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम तपास करत आहेत.
इस्लामपूर येथील महिलेची फसवणूक
इस्लामपुरमधून एक मोठी घटना समोर आली आहे. मासेमारी व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने इस्लामपूर येथील महिलेची तब्बल ३५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दापोली तालुक्यातील दांपत्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुक्ताई दत्ताराम चोगले, दत्ताराम नामदेव चोगले (रा. पाजपंढरी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत आशाराणी शिवाजी पाटील (वय ४९, रा. इस्लामपूर) यांनी फिर्याद दिली आहे. २३ नोव्हेंबर २०२३ ते २९ एप्रिल २०२४ दरम्यान हा प्रकार घडला आहे.