संग्रहित फोटो
पुणे : शाळेतील वार्षिक समारंभावरुन वादावादी झाल्यानंतर नववीतील विद्यार्थ्याचा वर्गातच काचेच्या तुकड्याने गळा चिरण्याची धक्कादायक घटना घडली आहे. हडपसर भागातील मांजरी भागतील एका शाळेत ही घटना घडली आहे. याप्रकरणी १४ वर्षीय मुलावर हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याघटनेत १५ वर्षीय मुलगा जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, मांजरीतील शाळेत नववीत तक्रारदार मुलगा शिकायला आहे. गुन्हा दाखल झालेला मुलगा त्याच्या वर्गात आहे. शाळेत वार्षिक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. वार्षिक समारंभाच्या आयोजनावरुन दोघांत वाद झाला होता. मंगळवारी (१९ नोव्हेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास जखमी मुलगा वर्गात बसलेला होता. तेव्हा आरोपी मुलगा अचानक पाठीमागून आला. त्याने काचेच्या तुकड्याने त्याच्या गळ्यावर वार केला. या घटनेत तो जखमी झाला. मुलगा गंभीर जखमी झाल्यानंतर वर्गात मुले घाबरली. एकच गोंधळ उडाला.
मुलांनी शिक्षकांना घटनेची माहिती दिली. शिक्षकांनी मुलाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर हडपसर पोलिसांना घटनेची माहिती दिली. गळ्यावर वार केल्यानंतर देखील तो त्याला धमकावत होता. त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी १४ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक निरीक्षक दादासाहेब रोकडे अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : कात्रजमधील ‘त्या’ हुक्का पार्लरबाबतचे स्मरणपत्र व्हायरल; पोलीस दलात चर्चांना उधाण
पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली सिंहगड पायथ्यापासून अपहरण झालेल्या शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर (वय ७२) यांचा निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी (दिनांक १६) उघडकीस आली. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी एकाला अटक केली असून, दोघांना मध्यप्रदेश येथून ताब्यात घेतल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी दिली. खडकवासला धरणासह ओसाडे (ता. वेल्हे) गावच्या हद्दीत त्यांचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. अत्यंत निर्घृणपणे पोळेकर यांची हत्या केली गेली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी पोळेकर यांच्याकडे २ कोटी रुपयांसह आलिशान चारचाकीची खंडणी मागितली होती, तसेच सप्टेंबर महिन्यात पोलीस चौकीत तक्रार केल्याच्या रागातून हा खून केल्याचे बोलले जात आहे.