मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- ट्विटर)
पुणे: अहमदनगर जिल्ह्यातील घायवळ प्रकरणात संबंधित व्यक्तीला राजकीय दबावाखाली पोलिसांनी क्लीन चिट दिल्याचे समोर आले असून, यावर आता सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी होणार असून, ज्यांनी चुकीचा अहवाल सादर केला त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
फडणवीस म्हणाले, सदर व्यक्तीने पासपोर्टसाठी अर्ज केला असताना पोलिसांनी त्याला निर्दोष घोषित करत अहवाल दिला, मात्र त्या अहवालात तो व्यक्ती त्या परिसरात राहत नाही, ही महत्त्वाची नोंद केली गेली नाही. त्यामुळे त्याला पासपोर्ट मिळाला आणि तो देशाबाहेर पळून गेला. या प्रकरणात कोणत्या नेत्याचा राजकीय दबाव होता, निवडणुकीत त्याचे संबंध कोणाशी होते, याचीही चौकशी केली जाईल.
गुंड निलेश घायवळच्या भावाच्याही अडचणी वाढल्या; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई
फडणवीस यांनी पुढे सांगितले की, अशा प्रकारच्या प्रवृत्तीला कोणत्याही पक्षात स्थान दिले जाणार नाही. हा विषय केवळ एका व्यक्तीचा नाही, तर शासनव्यवस्थेवरील विश्वासाशी निगडीत आहे. त्यामुळे जबाबदार अधिकारी व राजकीय हस्तक्षेप करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रातील महायुतीच्या बैठकीचाही आढावा घेतल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, युती टिकवण्यासाठी सकारात्मक वातावरण आहे. काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याची गरज भासली तरी मित्रपक्षांवर टीका करायची नाही, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
वैयक्तिक टीका टाळावी
फडणवीस यांनी सांगलीतील पडळकर-जयंत पाटील वादाबाबतही प्रतिक्रिया दिली. “वैयक्तिक टीका टाळावी, हे स्पष्ट निर्देश दिले आहेत. चंद्रकांत दादांनी स्वतः हस्तक्षेप करून वैयक्तिक वाद मिटविण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी म्हटले.
गुंड निलेश घायवळच्या भावाच्याही अडचणी वाढल्या
कोथरूडमधील गोळीबार प्रकरणात दाखल मोक्काच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, या गुन्ह्यात निलेश घायवळचा भाऊ तसेच पिस्तूल प्रकरणात चर्चेत आलेला सचिन घायवळ यालाही आरोपी करण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे घायवळ बंधूंच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्याकडे हा तपास देण्यात आला आहे.
गुंड निलेश घायवळच्या भावाच्याही अडचणी वाढल्या; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई
कोथरूड भागात कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ याच्या टोळीकडून एका तरुणावर शुल्लक कारणावरून गोळीबार तसेच दुसऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला करून त्यांच्या खूनाचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी कोथरूड पोलिसांत दोन स्वतंत्र गुन्हे नोंद केले होते. या गुन्ह्यात निलेश घायवळचा समावेश समोर आल्यानंतर त्यालाही या गुन्ह्यात आरोपी केले होते. याच गुन्ह्यात पोलिसांनी मोक्का कारवाई केली आहे. गुन्ह्याचा तपास कोथरूड विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊसाहेब पठारे यांच्याकडून सुरू होता.