संग्रहित फोटो
केजहून जवळबनकडे तिघे कारमधून प्रवास करत होते. पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट कठड्यावर जाऊन आदळली. धडक एवढी जोरदार होती की, वाहनाच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. तिघेही कारमध्ये अडकून पडल्याने घटनास्थळी काही काळ मदतकार्याची धावपळ सुरू झाली. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार केशव खाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने वाहनातील तिघांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय तपासणीनंतर प्रमोद उर्फ सुंदर उत्तम सातपुते आणि प्रशांत उर्फ महादेव दिगंबर करपे यांना मृत घोषित करण्यात आले. दत्ता तपसे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती जवळबन येथे पोहोचताच गावावर शोककळा पसरली आहे. अपघातामागील नेमके कारण तसेच वाहनावरील नियंत्रण कशामुळे सुटले, याचा तपास पोलिस करत आहेत.
कारचा पुढील भाग झाला चक्काचूर
केज-अंबाजोगाई महामार्गावर चंदनसावरगाव शिवारातील सुतार शेत परिसरात भरधाव कार पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर आदळली. धडकेनंतर कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. वाहनातील तिघे अडकले होते. ग्रामस्थ आणि पोलिसांनी मदतकार्य करून त्यांना बाहेर काढले. रुग्णालयात दोघांना मृत घोषित करण्यात आले, तर एकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
पोलिसांचे मदतकार्य
सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार केशव खाडे यांनी घटनास्थळी मदतकार्य केले. ग्रामस्थांच्या सहकार्याने कारमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात आले.






