कोपरखैरणेत फटाक्यांचा बेफाम खेळ! रस्त्यावर हुल्लडबाज तरुणांचा जीवघेणा प्रकार
सावन वैश्य , नवी मुंबई: दिवाळी म्हटलं की लहान मुलांच्या आनंदाला पारावार राहत नाही. फराळ खाऊन आणि फटाके वाजवून बच्चे कंपनी आपली दिवाळी साजरी करते. पण अशा वेळी काही अपघात घडून आपल्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता असते. दरम्यान, कोपरखैरणेमध्ये फटाके फोडताना नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जातो. कोपरखैरणे सेक्टर 20 मधील काही हुल्लडबाज तरुण भर रस्त्यात इतरांना इजा किंवा एखादा अनर्थ घटना होईल अश्या पद्धतीने फटाके फोडत आहेत. नवी मुंबईत झालेल्या 2 वेगवेगळ्या आगीच्या घटनेत एकूण 6 जणांना आपला जीव गमवावा लागला. यामुळे नवी मुंबईत दिवाळी सणाला गालबोट लागले आहे.
असं असताना देखील काही हुल्लडबाज तरुण फटाके नियमित पद्धतीने फोडण्याचं सोडून फटाक्यांसोबत खेळ खेळत आहेत. त्यांचा हाच खेळ एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो. काल रात्री लक्ष्मीपूजनच्या दिवशी कोपरखैरणे सेक्टर 20 मध्ये काही हुल्लडबाज तरुण नागरिकांच्या जीवावर बेतेल अश्या प्रकारे फटाके फोडत होते. या तरुणांनी रॉकेट रस्त्यावर आडवा ठेऊन पेटवणे, रॉकेट हातात धरून पेटवणे, अश्या प्रकारच्या जीवघेणा प्रकार कोपरखैरणे मध्ये रात्री सुरु होता. विशेष म्हणजे रहिवाशांची रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरु असतानाच हा प्रकार सुरु होता. त्यामुळे अश्या हुल्लडबाज तरुणांवर संताप व्यक्त करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. नवी मुंबईत नुकत्याच दोन आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यांचे कारण जरी अद्याप समोर आले नसले तरी, अश्या प्रकारे फटाके फोडणे एखाद्या आगीचे कारण होऊ नये म्हणजे झालं… त्यामुळे या तरुणांवर ताबडतोब कारवाई करावी…. नाहीतर यांचा खेळ होईल आणि एखाद्याचा जीव जाईल.
या प्रकारानंतर कोपरखैरणे पोलिसांनी काही व्यक्तींविरोधात प्रिव्हेंटिव्ह अॅक्शन घेतली आहे. मात्र, नागरिकांच्या म्हणण्यानुसार व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अजून प्रत्यक्ष समज दिली नाही. स्थानिकांचा प्रश्न आहे की, “नेमके हे लोक कोण आहेत? पोलिस त्यांची ओळख पटवून कारवाई करतील का? केवळ प्रिव्हेंटिव्ह अॅक्शन सांगून विषय संपवला जाणार का?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटनांवर फक्त समज न देता कठोर पाऊल उचलावे. तसेच, पालकांनीही आपल्या मुलांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी. “आज खेळ वाटतोय, पण उद्या दुर्घटना घडली तर आयुष्यभराचं दुःख होईल, नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. फटाके सुरक्षित ठिकाणी, निर्धारित वेळेत आणि नियमांचे पालन करूनच फोडावेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.