
गुंतवणुकीतून ज्यादा पैशांच्या आमिषाने महिलेला तब्बल 49 लाखांचा गंडा; सोशल मीडियावर 'तो' मेसेज पाहिला अन्...
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका महिलेची सायबर चोरट्यांनी ४९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ५६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बुधवार पेठेतील श्री जोगेश्वरी मंदिराजवळील एका सोसायटीत राहायला आहेत. १८ ऑगस्ट रोजी सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत संदेश पाठविला. महिलेने समाज माध्यमातील संदेश पाहिला. चोरट्यांनी महिलेला गुंतवणूक योजनेबाबत माहिती संदेशात दिली होती. गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी महिलेला दाखविले. त्यानंतर महिलेने १५ ते २० दिवसांत चोरट्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने ४९ लाख रुपये जमा केले.
दरम्यान, रक्कम गुंतविल्यानंतर महिलेला परतावा मिळाल्याचे भासविण्यात आले. प्रत्यक्षात महिलेला परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भिंगारदिवे तपास करत आहेत.
खासगी सावकाराकडून अभियंता महिलेला पैशांसाठी तगादा
खासगी सावकाराकडून घेतलेल्या सहा लाख रुपयांच्या कर्जापोटी अभियंता महिलेने तब्बल अडीच कोटी रुपये दिल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात समोर आला आहे. एवढी मोठी रक्कम दिल्यानंतरही पैशांसाठी तगादा लावण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे. वसुलीसाठी गुंडांची भीती दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या, तसेच दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
एटीएम कार्ड, चेकबुकही घेतल्याचा आरोप
फिर्यादीनुसार, गायकवाड याने स्टॅम्पवर नोटरी करून घेतल्यानंतर गीता मोरे यांचे सोन्याचे दागिने, चेक आणि एटीएम कार्ड ताब्यात घेतले. त्यांच्या बँक खात्यात जमा होणारी रक्कमही एटीएमच्या माध्यमातून परस्पर काढून घेतल्याचा आरोप आहे. याशिवाय, सोनाराकडे गहाण ठेवलेले लाखो रुपयांचे दागिनेही परस्पर सोडवून घेतल्याचे मोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.