लग्नाच्या आमीषाने तरुणीची फसवणूक (फोटो- टीम नवराष्ट्र/istockphoto)
पुणे:पहिले लग्न झाले असतानाही मॅट्रीमोनी डॉटकॉम संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे भासवून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून १० लाख रुपये घेतले. त्यानंतर तिला आपले लग्न झाले असून पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीने विषारी औषध घेऊन आपल्या क्लिनिकमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत पोपट बाबुराव फडतरे (वय ५८, रा. बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कुलदिप आदिनाथ सावंत (वय ३०, रा. उमराणी रोड, शंकर कॉलनी, जि. सांगली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बिबवेवाडीतील पीएमटी कॉलनी येथील तुळजाभवानी सोसायटीत ७ जानेवारी रोजी घडली होती. पल्लवी पोपट फडतरे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे.
हेही वाचा: मुंढव्यात ‘दम मारो दम’; हाॅटेलमधील हुक्का पार्लरवर गु्न्हे शाखेची कारवाई
पोलिसांच्या माहितीनुसार, कुलदिपचे लग्न झाले होते. तरीही त्याने मॅट्रीमोनी डॉट कॉम साईटवर नोंदणीकरून आपण अविवाहित असल्याचे भासविले. दरम्यान, तो व तक्रारदार यांच्यात लग्नाबाबत बोलण्याची सुरूवात झाली. तो तक्रारदारांना देहु येथे समक्ष जाऊन भेटला. पण, त्याचे वागणे व आरोपीचा दवाखाना योग्य वाटले नाही, म्हणून त्यांनी कुलदिपला नकार कळविला. असे असताना तक्रारदारांच्या परस्पर मुलगी पल्लवीशी संपर्क साधला. तिला लग्नाचे आमिष दाखविले. पल्लवी बीएमएसएच झाली होती. तिचे तुळजाभवानी सोसायटीत क्लिनिक आहे.
कुलदिपने तिच्यावर प्रेमाचे जाळे टाकले. तिला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून १० लाख रुपये घेतले. नंतर तिने लग्नाचा विषय काढल्यावर आपले लग्न झाले असून आपली पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. याचा तिला मोठा मानसिक धक्का बसला. तिने त्याच्याकडे १० लाख रुपये परत मागितले. परंतु, तो टाळाटाळ करु लागला. तेव्हा तिने चिठ्ठी लिहून आपल्या क्लिनिकमध्ये विषारी औषध घेतले.
हेही वाचा: पुण्यातील महापालिका भवनजवळ दोघांना लुटले, मारहाणही केली अन्…
ही बाब समजल्यावर तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना ८ जानेवारी रोजी तिचा मृत्यु झाला. याबाबत पोपट फडतरे यांनी सांगितले की, कुलदिप सावंतने आपल्या मुलीची फसवणूक केली. तिच्यापासून आपले लग्न झाल्याचे लपवून ठेवले. तिच्या मृत्युला कुलदिप जबाबदार आहे. ती रुग्णालयात उपचार करताना तो तिला पहायला आला होता. आम्ही गडबडीत असल्याने त्यावेळी काही करु शकलो नाही. आपल्या मुलीला न्याय मिळावा, अशी आमची अपेक्षा आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शशांक जाधव करीत आहेत.






