जुन्या वादातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण
रत्नागिरी : शहरातील राजीवडा पुलाखालील परिसरात राहणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणाला जुन्या वादातून आणि संशयातून चौघांनी मिळून बेदम मारहाण केली. गुरुवारी (दि.२६) रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी अरमान नझीर होडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रत्नागिरी शहर पोलिसांत रमजान नवाज मिरकर, साजिद बावा मिरकर, अझरुद्दीन अलीमिया मुजावर आणि महम्मद बावा मिरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत.
फिर्यादी अरमान होडेकर आणि संशयित आरोपी एकाच परिसरातील रहिवासी असून, एकमेकांच्या परिचयाचे आहेत. या वादाचे मूळ जैतापूर येथील एका सामायिक मैत्रिणीशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. संबंधित मैत्रिणीने रमजान मिरकर याचे काही सामान फिर्यादी अरमानकडे दिले होते. हे सामान पोहोचवत असताना फिर्यादी हा त्या तरुणीला का भेटतो आणि तिच्याशी का बोलतो, असा संशय रमजान मिरकर याने मनात धरला होता. याच रागातून त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली, ज्याचे रूपांतर पुढे हिंसक हाणामारीत झाले.
हेदेखील वाचा : Pune Crime: नोकरी गेल्याचा ताण ! गजबजलेल्या एफसी रोडवर व्यक्तीने गळ्यावर ब्लेडने केला वार; काय घडलं नेमकं?
या वादावेळी रमजान नवाज मिरकर याला साजिद बावा मिरकर, अझरुद्दीन अलीमिया मुजावर आणि महम्मद बावा मिरकर यांनी साथ दिली. या चौघांनी मिळून फिर्यादी अरमान याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. लाथाबुक्क्यांसह लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने त्याच्या पाठीवर, कमरेवर व उजव्या पायावर जबर प्रहार करून त्याला गंभीर दुखापत केली.
चिव्याच्या काठीने बेदम मारहाण
दुसरीकडे, संगमेश्वर तालुक्यातील पोचरी खालची देसाईवाडी येथे किरकोळ वादातून एका तरुणाला चिव्याच्या काठीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी दोन नातेवाईकांसह अन्य दोन अनोळखी इसमांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.






