पोटावर अन् छातीवर सपासप वार! निष्पाप तरुणाची माथेफिरुनी केली हत्या, मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार (फोटो सौजन्य-ट्विटर)
गेल्या काही दिवसांपासून जालन्यात गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांबरोबरच उद्योजकांमध्येही घबराटीचे वातावरण आहे. गेल्या पाच वर्षांत जालना शहरात अवैध कट्टा, अमली पदार्थ, गुटखा, मटका, गांजा, तलवार आदींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यादरम्यान जालना शहरातील मियासाहेब दर्गा येथे 8 जुलै रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. शेख समीर शेख जमील (25) रा. मियासाहेब दर्गा जालना असं मयत तरुणाचे नाव आहे.
शेख समीर हा तरुण जेवण करुन घराबाहेर आला असता एका माथेफिरु व्यक्तीने तरुणाच्या पोटावर आणि छातीवर 8 ते 10 वार चाकून केले. त्यात तरुण रक्तबंबाळ झाला. यावेळी परिसरातील नागरिकांनी तरुणाला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र खाजगी रुग्णालयातून डॉक्टरांनी त्याला घाटी रुग्णालयात पाठवले. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची तपासणी करुन त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईकांनी मोठा गोंधळ घातला. जोपर्यंत आरोपीवर गुन्हा दाखल होत नाही आणि तात्काळ अटक केली जात नाही. तोपर्यंच मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर घाटी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात समुदाय जमा झाला होता. मात्र, तात्काळ पोलिसांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन नातेवाईकांना विश्वासात घेतले आणि आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करू, असं आश्वासन दिले त्यामुळे वातावरण निवळलं.
तसेच माथेफिरु व्यक्ती कोण होता. त्याने अचानक मयत समीरच्या पोटावर आणि छाती 8 ते 10 वेळा वार का केले हे अद्यापर्यंत कळू शकलेले नाही. दरम्यान या घटनेने जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृत समीर हा कपड्याच्या दुकानावर कामाला होता. दुकानाला सुट्टी असल्याने तो घरी आला होता.