'...तर दिल्लीतील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढा'; CEC राजीव कुमार यांना केजरीवालाचं खुलं आव्हान
दिल्लीच्या निवडणूक प्रचारात यमुनेच्या पाण्याने एन्ट्री केली असून त्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला होता. निवडणूक आयोगाने केजरीवाल यांना नोटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान गुरुवारी यमुनेच्या पाण्यावर सुरू झालेल्या राजकारणावर बोलताना केजरीवाल यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवाय त्यांना राजकारण करायचं असेल तर दिल्लीतील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवावी असं खुलं आव्हान दिलं आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले, दिल्लीत ऐन निवडणुकीत चादरी वाटल्या जात आहे. त्याविषयी आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलं. मात्र त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. कोणाच्या घरी पैसे आहेत, त्याची माहिती दिली. त्यावर ते बोलण्यासाठी तयार नाहीत. काल त्यांनी ज्यापद्धतीने वक्तव्य केली आहेत त्यावरून असं स्पष्ट होतं की निवडणूक आयोग राजकारण करत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना निवृत्तीनंतर कोणतरी पद हवं आहे, म्हणून हा आटापीटा सुरू असल्याचं ते म्हणाले.
जर मुख्य निवडणूक आयुक्तांना राजकारण करायचे असेल तर त्यांनी दिल्लीतील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. निवडणूक आयोगाची इतकी बरबादी कधीच झाली असेल असं मला वाटत नाही. मला खात्री आहे की ते मला दोन दिवसांत तुरुंगात टाकतील. पण मी घाबरत नाही. देशाने अशा निवडणुका यापूर्वी कधीही पाहिल्या नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे.
दिल्ली निवडणुकीपूर्वी ‘यमुनेत विष’ या विधानामुळे अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. निवडणूक आयोगाने आप प्रमुख केजरीवाल यांना या मुद्द्यावर ५ प्रश्न विचारले आहेत आणि उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत त्यांची उत्तरे देण्यास सांगितले आहे.
निवडणूक आयोगाने केजरीवाल यांना पाच प्रश्न केले होते. त्यामध्ये हरियाणा सरकारने यमुना नदीत कोणत्या प्रकारचे विष मिसळले? हत्याकांड घडवून आणणाऱ्या विषाचे प्रमाण, स्वरूप आणि पद्धत याबद्दल कोणते पुरावे आहेत? विष कुठे सापडले? दिल्ली जल बोर्डाच्या कोणत्या अभियंत्यांनी हे कुठे आणि कसे ओळखले? विषारी पाणी दिल्लीत जाण्यापासून रोखण्यासाठी अभियंत्यांनी कोणती पद्धत अवलंबली?
२७ जानेवारी रोजी एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाकडून दिल्लीला पुरवल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या पाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. केजरीवाल म्हणाले होते, ‘लोकांना पाण्यापासून वंचित ठेवणं, यापेत्रा मोठं पाप नाही. भाजप आपल्या घाणेरड्या राजकारणाने दिल्लीतील लोकांना तहानलेले ठेवू पाहात आहे. हरियाणाहून पाठवल्या जाणाऱ्या पाण्यात विष मिसळत आहेत. केजरीवाल पुढे म्हणाले, ‘हे प्रदूषित पाणी इतके विषारी आहे की दिल्लीत असलेल्या जलशुद्धीकरण संयंत्रांच्या मदतीने ते प्रक्रिया करता येत नाही. भाजप दिल्लीतील रहिवाशांची सामूहिक हत्या करू इच्छित आहे. पण आम्ही हे होऊ देणार नाही, असा आरोप त्यांनी केला होता.
अरविंद केजरीवाल यांच्या या टिप्पणीनंतर भाजप आणि काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. दोघांनीही केजरीवालांच्या दाव्यांच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर, निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावली होती आणि त्यांच्या विधानांच्या समर्थनार्थ तथ्यात्मक पुरावे देण्यास सांगितले होते. केजरीवाल यांना यापूर्वी २९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती. अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दाखल केले होते आणि त्यांच्या दाव्यांच्या समर्थनार्थ दिल्ली जल बोर्डाच्या सीईओंच्या पत्राचा हवाला दिला होता. त्यांनी, या टिप्पण्या एका नागरी समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी केल्या गेल्या होत्या, असं उत्तर दिलं होतं.