कोपरगावात पॉलिटिकल वादळ!
अहिल्यानगर मधील कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरणात मोठे ‘पॉलिटिकल वादळ’ उठले आहे. युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी निर्णायक पाऊल उचलले आहे. उबाठाच्या उपजिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
दरम्यान, उबाठातर्फे सपना भरत मोरे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली असून एबी फॉर्म देऊन उबाठाने निवडणुकीचा बिगुल फुंकला आहे. तहसीलदार महेश सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार नगराध्यक्षपदासाठी विजय वहाडणे आणि राजेंद्र झावरे या दोन उमेदवारांचे, तर नगरसेवकपदासाठी ३७ अर्ज दाखल झाले आहेत.
झावरे यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे उबाठा गटात असंतोष पसरल्याची चर्चा आहे. त्यांच्या पाठोपाठ कैलास जाधव यांनीही उपजिल्हाप्रमुख पदासह रिक्षा सेना संघटनेतील जबाबदाऱ्या सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. जाधव यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 700 कार्यकर्त्यांची मोठी फौज शिंदे गटात सामील झाली आहे. जाधव प्रभाग 8 मधून नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवणार आहेत.
उबाठातर्फे नगराध्यक्षपदासाठी सपना मोरे यांना अधिकृत उमेदवारी देताना, शहरातील बंडखोरांना रोखण्यासाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठवून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उबाठाचे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
उबाठाचे माजी शहरप्रमुख कलविदर इडियाल आणि गुरमीतसिंग डडियाल यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. अनेक मोठी नावे काही तासांच्या अंतराने पक्ष सोडून गेल्याने उबाठाला मोठा धक्का बसला असून कोपरगावचे राजकीय समीकरण वेगाने बदलताना दिसत आहे.
काशीनाथ चौधरी कोण आहेत? पालघर साधू हत्या प्रकरणाशी काय संबंध ? भाजपने २४ तासांत पक्षातून काढून टाकले
सपना मोरे यांनी शहरविकासाचा रोडमॅप जाहीर करताना सांगितले की धूळमुक्त रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, मोकाट जनावरांवर नियंत्रण, मुलांसाठी बागा व खेळणी, तसेच प्रलंबित विकासकामांना गती हे आमचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे. एकनाथ शिंदे गटाने शहरविकासाला प्राधान्य देत, निष्ठावान कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यावर भर दिला आहे.






