समरजितसिंह घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
मुरगूड : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकारण रंगले आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस बाकी राहिले असून प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आला आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये देखील जोरदार राजकारण रंगले आहे. दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांना अल्पसंख्याक असतानाही भरभरून दिले. या वडीलांसमान नेत्यांना ऐनवेळी दगा दिला. सर्व निष्ठा विकुन मुश्रीफांनी लाल दिव्याची गाडी मिळविली. अशा गद्दार भस्मासुराला गाडून स्व.मंडलिक साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकवेळ संधी द्या, असे आवाहन समरजितसिंह घाटगे यांनी केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी प्रचारसभा धडाका लावला आहे. म्हाकवे येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. समरजितसिंह घाटगे म्हणाले, “पालकमंत्री मुश्रीफ साहेबांना असे वाटते की, पैशाने सगळं विकत घेता येते. सर्वसामान्य माणसांच्या टॅक्स मधून आलेल्या पैशातूनच विकासकामे होतात. या विकासकामातील तुम्ही पैसे खाल्ले आहेत. त्यामुळे जनता तुमची सुरत लुटणार आणि तुतारी जिंकणार. ही निवडणूक पालकमंत्री मुश्रीफ आणि समरजीतसिंह घाटगे यांची राहिलीच नाही. स्वाभिमानी जनतेने गद्दाराला काढण्यासाठी निवडणूक हातात घेतले आहे,”असे मत समरजीतसिंह घाटगे यांनी व्यक्त केले.
आमचं सरकार फेसबुक लाइव्ह नाही तर…; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात
पुढे ते म्हणाले की, “कागल गडहिंग्लज उत्तुर विधानसभा मतदारसंघात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान धोक्यात आले आहे. पालकमंत्र्यांना महिलांचा आदर करावा असे वाटत नाही. हसन मुश्रीफसाहेब दलित समाजाला आता तुमचे भावनिक भाषण नको आहे. तुमच्यामध्ये धाडस असेल तर पंचवीस वर्षात दलित समाजातील किती तरुणांना उद्योगधंदे उभारण्यासाठी सहकार्य केले ते जाहीरपणाने सांगावे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पंचवीस वर्षे काम केल्यानंतरही त्यांना पैसे देऊन, वेष बदलून खोटे वासुदेव का आणावे लागतात. खरोखरच तुम्ही पंचवीस वर्षे काम केले असता तर अशी परिस्थिती आली नसती,” असा घणाघात समरजीतसिंह घाटगे यांनी केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024: चंद्रपुरमध्ये मतदान जनजागृतीसाठी ‘रन फॉर व्होट’
या सभेमध्ये स्वाती कोरी म्हणाल्या “गडहिंग्लज साखर कारखाना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बंद पाडण्याचे पाप केले. गडहिंग्लज शहराला खाजगी मालमत्ता समजून त्यांनी विकायला काढले आहे. मी म्हणेल ती पूर्व दिशा,त्यांची हुकूमशाही व दडपशाही सुरु आहे.
या त्यांच्या प्रवृत्तीला मूठमाती देऊया. तर दत्तोपंत वालावलकर म्हणाले,” गेली पंचवीस वर्षे आम्ही मुश्रीफांच्या विचारधारेला विरोध करत आलो आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या त्यांच्या धोरणाविरोधात आम्ही काम केले आहे. या निवडणुकीत संजयबाबा घाटगे यांनी विचार बदलला, मुश्रीफांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले. म्हणून आम्ही बाबांसोबत गेलो नाही. मुश्रीफांनी आम्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिलेला त्रास, तुम्ही विसरला असाल. पण आम्ही तीळभरही विसरलेलो नाही.” ॲड .सुरेश कुराडे म्हणाले,”स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांची या गावाशी नाळ खूप घट्ट जुळलेली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना गाढण्याचं स्व.मंडलिकांचे अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा निरोप घेऊनच मी आपल्याकडे आलो आहे.” असे मत त्यांनी मांडले.