फोटो सौजन्य- सोशल मीडिया
राज्यात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराचा कालावधी येत्या सोमवारी दि. 18 नोव्हेंबरला संपत असल्याने प्रत्येक पक्षाने प्रचारासाठी जोर लावला आहे. उमेदवारही मतदारसंघात रॅली आणि मतदारांच्या गाठीभेटींनाही महत्व देत आहेत. दरम्यान राज्यात मतदान मोठ्या प्रमाणात व्हाव याकरिता प्रशासनाकडून वेगवगेळ्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज दि. 15 नोव्हेंबरला चंद्रपुरात जिल्हा प्रशासनाने रन फॉर व्होट चे आयोजन करत जनजागृती केली.
येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृतीसाठी ‘स्वीप’ अंतर्गत विविध उपक्रम राबविले आहेत. नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, शुक्रवारी चंद्रपूर येथे मिनी मॅरेथॉन ‘रन फॉर व्होट’ चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थी, तरुण-तरुणी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत, मतदानाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.
मॅरेथॉनचे आयोजन व उद्घाटन
‘रन फॉर व्होट’ या मिनी मॅरेथॉनचे आयोजन चंद्रपूर येथील आझाद बगिचा येथे करण्यात आले होते. चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून या मॅरेथॉनला सुरुवात केली. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी विजय पवार, महानगरपालिकेचे उपायुक्त मंगेश खवले, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, उपशिक्षणाधिकारी निवास कांबळे, नायब तहसीलदार गाद्देवार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
घोषवाक्यांसह जनजागृती
मॅरेथॉनदरम्यान, “माझे मत माझा अधिकार”, “होय, मी मतदान करणारच” आणि “सर्वांनी मतदान करूया – लोकशाहीला बळकट करूया” अशा विविध घोषवाक्यांद्वारे चंद्रपूरकरांनी जनजागृती केली. या मॅरेथॉनने आझाद बगिचातून गिरनार चौक, गांधी चौक, जटपुरा गेट अशी वळणं घेत परत आझाद बगीचा येथे समारोप केला.
समारोप व विजेत्यांचा सन्मान
समारोप कार्यक्रमात जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी उपस्थित राहून मतदानासाठी नागरिकांना अधिकाधिक प्रोत्साहन दिले. विजेत्यांना तीन गटांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ₹3000, ₹2000, ₹1000 चे धनादेश, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
सहभागी गट व संस्था
या मिनी मॅरेथॉनमध्ये विविध शाळांमधील विद्यार्थी, जिल्हा परिषद व महानगरपालिकेचे शिक्षक, चंद्रपूर योग नृत्य परिवार, फन ग्रुप, पतंजली ग्रुप, पोलीस भरती ग्रुप, कराटे ग्रुप आणि नेटबॉल ग्रुप यांनी उत्साहाने सहभाग घेतला. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या टी-शर्ट आणि टोपी परिधान करून सहभागी धावपटूंनी जनजागृतीचा संदेश दिला. सर्व सहभागींसाठी प्रमाणपत्र आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
राज्यात 9.7 कोटी मतदार असून प्रशासनाकडून मतदारांकरिता 1 लाखाहून जास्त मतदान केंद्रे उभारण्यात येत आहेत. दुर्गम भाग ते शहरी भाग येथील मतदान वाढावे अशी मतदार केंद्राची व्यवस्था प्रशासनाकडून केली गेली आहे. सध्या 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि 40 टक्केहून अधिक अपंगत्व असलेल्या दिव्यांगांसाठी गृह मतदान घेण्यात येत आहे.