राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील दीपोत्सावाची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराचा धुराळा असून केंद्रातील नेते राज्यामध्ये ठाण मांडून बसले आहेत. पक्षाचे जोरदार प्रचार व सभा सुरु आहेत. मागील महिन्यामध्ये निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची निवडणूक जाहीर केली. तेव्हापासून राज्यामध्ये आदर्श आचारसंहित सुरु झाली आहे. या काळामध्ये पक्षाची चिन्ह व नावं असलेले कार्यक्रम घेण्यास परवानगी नाही. तरी देखील कार्यक्रम घेतले जात आहेत. आता दिवाळीच्या काळामध्ये मनसेकडून साजरा करण्यात आलेल्या दीपोत्सवामुळे निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मनसेकडून दरवर्षी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दीपोत्सव साजरा केला जातो. शिवाजी पार्क याठिकाणी नेत्रदीपक अशी विद्युत रोषणाई केली जाते. सेल्फी पॉईंट उभारले जातात. त्यामुळे मुंबईकरांची मोठी गर्दी शिवाजी पार्कवर होत असते.
यंदा देखील राज ठाकरे यांनी जोरदार दीपोत्सव साजरा केला. मात्र यावर्षी दिवाळीच्या काळामध्ये आदर्श आचारसंहिता सुरु होती. त्यामुळे राज ठाकरेंच्या या दीपोत्सवावर अनेक नेत्यांनी व पक्षांनी आक्षेप घेतला आहे. मनसेकडून आचारसंहिता काळातही हा दीपोत्सव साजरा होत असल्याने शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना यासंदर्भात पत्र पाठवून कारवाई करण्याच आवाहन केले आहे.
हे देखील वाचा : भाजपची मोठी कारवाई, 37 जागांवर बंडखोरी करणाऱ्या 40 बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उपसचिव सचिन परसनाईक यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त पत्र लिहिले आहे. त्या पत्रात त्यांनी दीपोत्सवाबाबत तक्रार दाखल केली. ते म्हणाले की, “महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक 2024 ची घोषणा झाली आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असतानाही बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला छत्रपती शिवाजी महाराज पार्क या महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक स्थळावर निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून ‘दीपोत्सव’ साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातर्फे सर्वत्र बॅनर, गेट व कंदिल लावण्यात आले आहेत. आदर्श आचारसंहिता काळात सार्वजनिक मालमत्ता विरूप करण्याच्या कलमाखाली हा सरळसरळ नियमभंग आहे.”
पुढे लिहिले आहे की, “या कार्यक्रमाच्या उद्घटनावेळी स्थानिक माहिम विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार अमित राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यामुळे नियमानुसार उमेदवाराच्या निवडणूक खर्चात अंतर्भूत करणारी बाब ठरत असल्याने संपूर्ण दीपोत्सवाचा खर्च हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना माहिम विधानसभा उमेदवार अमित राज ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा”, अशी मागणीही शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने केली. “तसेच आदर्श आचारसंहिता काळात सार्वजनिक जागांवर पक्षाच्या प्रचारात बेकायदेशीर परवानगी देण्याचा महापालिका अधिकारी व इतर संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी यावर भारत निवडणूक आयोगाने सख्त कारवाईचे निर्देश द्यावेत”, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे.