File Photo : Amol Kolhe
पंढरपूर : माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची जाहीरसभा करकंब येथे झाली. ‘लोकसभा निवडणुकीला येथील जनता दिल्लीच्या तक्तासमोर झुकली नाही. त्यांना धडा शिकवला. याही निवडणुकीला जनता महायुतीला चांगलाच धडा शिकवेल’, असे डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.
हेदेखील वाचा : नितीन गडकरींवर निवडणूक आयोगाची कारवाई, लातूरमध्ये केली हेलिकॉप्टरची चौकशी
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि करकंब परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार अमोल कोल्हे म्हणाले, ‘लोकसभेला फटका बसल्यानंतर महायुती सरकारने मतांवर डोळा ठेवून अनेक योजना काढल्या. मात्र, शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने राज्यात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत. तर सत्ताधाऱ्यांकडून उद्योगपतींना कर्जमाफी दिली गेली. यामुळे सत्ताधाऱ्यांवर राज्यातील शेतकरी नाराज आहेत’.
तसेच सत्ता मिळवण्यासाठी भाजपने पक्ष फोडाफोडीचे राजकारण केले. यामुळे विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्र धर्म जपण्याची निवडणूक झाली आहे. लोकसभा निवडणुकीला येथील जनता दिल्लीच्या तक्तासमोर झुकली नाही. त्यांना धडा शिकवला. याही निवडणुकीला जनता महायुतीला चांगलाच धडा शिकवेल, असा हल्लाबोल खासदार कोल्हे यांनी यावेळी महायुती सरकारवर केला.
शरद पवारांनी शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करण्याचे केले काम
शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करण्याचे काम केले. त्याच पद्धतीने अभिजीत पाटील यांनी सहकारातून मोठे काम केले आहे. अभिजीत पाटील हे आमदार झाल्यावर शरद पवार यांचे या मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार आहे. यामुळे शरद पवार यांचा पठ्ठ्या अभिजीत पाटील आमदार होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांनी राज्यातील जनतेसाठी महाविकास आघाडीने काढलेल्या जाहीरनाम्याचे थोडक्यात माहिती दिली.
मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित
अभिजीत पाटील म्हणाले की, मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र, विरोधक मुद्द्यावर बोलत नाहीत. रस्त्याची दुरावस्था झाली आहे. करकंब येथे अनेक संतांच्या पालख्या मुक्कामी असतात. मात्र, कोणतीही सोय होत नाही. कोट्यवधी खर्च करूनही येथील नागरिकांना पिण्याचे पाणी देऊ शकले नाहीत, बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे.
परिसरातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी नाही
परिसरातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी नाही. करकंब नगरपंचायत न झाल्याने कोणताही निधी येत नाही. या मतदारसंघावर पवार साहेबांचे विशेष लक्ष आहे. यांना गड राखायला दिला तर ते मालक झाले, अशा शब्दांत शिंदे यांचा समाचार घेतला.
हे सुद्धा वाचा: संपूर्ण कर्जमाफी आणि कृषिपंपांना मोफत वीज…; भाजपने शेतकऱ्यांसाठी केली मोठी घोषणा, काय आहे भावांतर योजना?