देवेंद्र फडणवीसांच्या विजयाबद्दल नितीन गडकरी यांनी विश्वास व्यक्त केला आहे. (फोटो - ट्वीटर)
नागपूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण रंगले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे आता पक्षांकडून उमेदवार जाहीर केले जात आहेत. तर उमेदवार हे अर्ज दाखल करत आहेत. अनेक नेत्यांनी कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली. आज भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी गडकरींनी आशिर्वाद देत विजयाचा विश्वास व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सूचक विधान केले आहे. गडकरी म्हणाले की, गेल्या दहा वर्षात नागपूरात एक लाख कोटी पेक्षा जास्त निधीचे विकास कामे झाले. यात चांगले रस्ते झाले, 70 टक्के नागपुरकरांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळते आहे. आम्ही मिहानमध्ये 78 हजार स्थानिक तरुणांना नोकरी दिली आहे. जे देशात, जगात कुठे नाही, असे अनेक प्रकल्प एकट्या नागपुरात बघायला आज मिळत आहे. गेल्या 60-70 वर्षात काँग्रेसला जे जमले नाही ते महायुतीने दहा वर्षात केलं आहे. ही सर्व विकासकामे माझ्यामुळे, देवेंद्र किंवा चंद्रशेखर बावनकुळे अथवा अन्य कोणामुळे नाही. तर तुम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळे झाले आहे. आजवर जेवढा विकास तुम्ही पाहिला तो फक्त ट्रेलर होता, असली पिक्चर तो अभी बाकी है! त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवारांना,देवेंद्र फडणवीसांना संधी द्या, असे आवाहन नितीन गडकरी यांनी मतदारांना केले.
पुढे त्यांनी सूचक विधान करुन राज्याची सुत्रं देवेंद्र फडणवीसांकडे देण्याचे आवाहन जनतेला केले. नितीन गडकरी म्हणाले की, दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आपल्या मुलाबाळांना उमेदवारी देण्याची चिंता आहे. मात्र आम्हाला नागपूर आणि राज्याच्या विकासाची, गोरगरीबांच्या मुलांची काळजी आहे. तरुणांना आम्ही नोकरी मिळवून देत आहोत. प्रगतीच्या दिशेने देशाला पुढे नेत आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा सत्तेची सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्या हातात द्या, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे सारखे लोक सत्तेत गेले, तर ते पुन्हा चांगले काम करून दाखवतील, असे म्हणत नितीन गडकरी यांनी त्यांच्या उमेदवारांवर विश्वास व्यक्त केला. तसेच जनतेला पुन्हा एकदा महायुती सरकारला पाठिंबा देण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. पुढील महिन्यांमध्ये राज्यामध्ये कोणाचे सरकार स्थापन होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.