कर्जत तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करणार, गटविकास अधिकाऱ्यांचा विश्वास
कर्जत : गाव समृद्ध झाले तरच राज्याचा सर्वांगीण विकास साधता येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गावात यशस्वीरित्या राबवून जिल्हा राज्यात अभियानात अग्रेसर राहील, यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. याच दरम्यान राज्य सरकारच्या महत्वकांक्षी समजल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला कर्जत तालुक्यात शुभारंभ झाला आहे. या अभियान कर्जत तालुक्यात यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कार्य सुरू झाले असून जिल्ह्यात क्रमांक एक वर कर्जत पंचायत समिती राहील असा विश्वास गटविकास अधिकारी आणि प्रशासक सुशांत पाटील यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यासाठी तालुकास्तरीय कार्यशाळा कर्जत पंचायत समिती कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी गटविकास अधिकारी सुशांत पाटील तसेच आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून प्रतिनिधी म्हणून प्रसाद थोरवे यांच्यासह अभियानाची माहिती देण्यासाठी विशेष प्रतिनिधी उपस्थित होते.उप मुख्य कार्यकरी अधिकारी जालिंदर पाठारे,पाणी पुरवठा उप अभियंता अनिल मेटकरी,तालुका पशुधन विकास अधिकारी सचिन भोसले,तालुका गटशिक्षण अधिकारी अनंत खैरे, पर्याविक्षाधिनवेक्ष गट विकास अधिकारी मितेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.राज्यात १७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची संधी उपलब्ध होणार असून, सरपंचांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रसाद थोरवे यांनी केले.सुरुवातीला या अभियानाची माहिती ग्रामपंचायत विस्तार अधिकारी उज्ज्वला भोसले यांनी दिली.
गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सात घटकांवर आधारित आहे. तालुक्यातील सर्व 55 ग्रामपंचायत मधील सर्व ग्रामस्थांनी मिळून एकत्रित काम केल्यास गावांचा विकास शक्य आहे. गाव अधिकाधिक स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत तसेच जलसमृद्ध गाव करणे हा प्रमुख दृष्टिकोन आहे. राज्य शासन गावांच्या विकासासाठी अनेक योजना राबवत आहे. या अभियान कालावधीत आवास योजनेतील उद्दिष्टे पूर्ण करणे, ग्रामस्वच्छता, सुंदर शाळा उभारणी, महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, सौर ऊर्जेचा वापर, महिला बचतगटांचे सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये ठोस कामगिरी करण्यावर भर दिला जावा.असेही गट विकास अधिकारी सुशांत पाटील यांनी सांगितले.