बांगलादेशने केला विजयाचा श्रीगणेशा
Bangladesh vs Hong Kong Asia Cup 2025 : बांगलादेश संघाने आशिया कप २०२५ ची सुरुवात विजयाने केली. कर्णधार लिटन दासच्या अर्धशतकामुळे बांगलादेशने हाँगकाँगचा ७ विकेट्सने पराभव केला. यासह बांगलादेश संघाने ११ वर्षांचा जुना हिशोबही चुकता केला आहे. दोन्ही संघ शेवटच्या वेळी २०१४ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भिडले होते. त्यानंतर हाँगकाँगने बांगलादेशचा २ विकेट्सने पराभव केला.
आज (११ सप्टेंबर) आशिया कप २०२५ च्या तिसऱ्या सामन्यात बांगलादेशचा सामना हाँगकाँगशी झाला. दोन्ही संघांमधील हा ग्रुप-ब सामना अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने हाँगकाँगचा सात विकेट्सने पराभव केला. हाँगकाँगने ७ विकेट्सवर १४३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने १४ चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले.
आशिया कप २०२५ मध्ये हाँगकाँगचा सलग दुसरा पराभव आहे. हाँगकाँगला त्यांच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानकडून ९४ धावांनी पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, बांगलादेशी संघाने चालू स्पर्धेत दमदार सुरुवात केली आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. परवेझ हुसेन इमॉन १९ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर आयुष शुक्लाचा बळी ठरला. दुसरा सलामीवीर तन्जीद हसन तमीम (१४ धावा) अतिक इक्बालने माघारी पाठवला.
१४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशला तिसऱ्या षटकात पहिला धक्का बसला. परवेझ इमॉन १४ चेंडूत १९ धावा काढून बाद झाला. त्यानंतर सहाव्या षटकात तन्जीद पॅव्हेलियनमध्ये परतला. तन्जीद हसन १८ चेंडूत १४ धावा काढून बाद झाला. १८ व्या षटकात ३९ चेंडूत ५९ धावा काढून लिटन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने त्याच्या डावात ६ चौकार आणि एक षटकार मारला. ३६ चेंडूत ३५ धावा काढून तौहीद क्रिजवर नाबाद परतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या हाँगकाँगने २० षटकात सात गडी गमावल्यानंतर १४३ धावा काढल्या.
हाँगकाँगकडून निजाकत खानने सर्वाधिक ४२ धावा केल्या. बांगलादेशकडून तस्किन, रिशहाद आणि हसनने २-२ बळी घेतले. हाँगकाँगचे फलंदाज अंशुमन ४ आणि बाबर हयात १४ धावा काढून बाद झाले. झिशान अली ३४ चेंडूत ३० धावा काढून बाद झाला. कर्णधार यासिम मुर्तझा १९ चेंडूत २८ धावा करून धावबाद झाला. रिशहादने निझाकत खान (४२) आणि शाह यांना पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. पुढच्याच षटकात तस्कीनने एजाज खानला बाद केले.