Lucknow Bus Accident: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या काकोरी परिसरात गुरुवारी (आज) एक मोठा रस्ते अपघात झाला. गोलाकुआं गावाजवळ कैसरबाग डेपोची रोडवेज बस हरदोईहून लखनऊच्या दिशेने जात असताना अचानक अनियंत्रित होऊन एका खोल दरीत उलटली. एका टँकरची धडक बसल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याचे सांगितले जात आहे. या भीषण अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून, सुमारे डझनभर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बसच्या खाली दबलेल्या प्रवाशांना पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
थाना काकोरी क्षेत्र में भीषण सड़क हादसा होने की सूचना, कई लोग घाययल,
सड़क हादसे में पलटी रोडवेज बस, टिकैतगंज पुल के पास हुआ हादसा,@Uppolice @lkopolice @lucknowtraffic pic.twitter.com/9LvGdYAdPg— Akram~Journalist~(Lko Up) (@akram117080) September 11, 2025
प्रत्यक्षदर्शींच्या मते, बस खूप वेगात होती. काकोरीच्या गोलाकुआं गावाजवळ बसची एका टँकरसोबत जोरदार धडक झाली. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस सुरुवातीला रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही लोकांना धडकली आणि त्यानंतर २० फूट खोल दरीत जाऊन उलटली. अपघात इतका भीषण होता की परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच काकोरी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले.
स्थानिक लोकांनीही बचावकार्यात मोठी मदत केली. क्रेनच्या मदतीने बस सरळ करून तिच्या खाली दबलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. सुरुवातीला चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात आणि ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. उपचार सुरू असताना आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून, अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन बचावकार्य वेगाने करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जखमींना योग्य उपचार देण्याचे आदेश दिले असून, ते लवकर बरे व्हावेत अशीही कामना केली आहे.
ही बस हरदोईहून लखनऊच्या कैसरबाग बस स्टँडकडे येत होती. बसमध्ये सुमारे ५४ प्रवासी होते. काकोरीच्या टिकैतगंजजवळ टँकरसोबत झालेल्या धडकेनंतर बस २० फूट खोल दरीत उलटली. या अपघातामुळे बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले.