खडकवासला विधानसभेतून मनसेकडून मयुरेश रमेश वांजळे यांना उमेदवारी (फोटो - नवराष्ट्र टीम)
पुणे : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे जोरदार तयारी सुरु झाली आहे. महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रचार सुरु झाला असून उमेदवार जाहीर केले जात आहेत. त्याचबरोबर यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे हे देखील एक्शनमोडमध्ये आले आहे. त्यांचा मनसे पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरु असून अनेकांना उमेदवारी जाहीर देखील करण्यात आली आहे. त्याचबरोबर मनसेने पुण्यामध्ये देखील उमेदवार जाहीर केला आहे. मनसेचे दिवंगत नेते गोल्डमॅन रमेश वांजळे यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली आहे.
मनसे पक्षाचे राज ठाकरे यांनी सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्त जागांवर उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचबरोबर विधानसभेनंतर सत्तेमध्ये असणारे ह नक्की असा विश्वास देखील मनसे नेते राज ठाकरे यांनी विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर आता मनसेची यादी जाहीर करण्यात आली आहे. 45 उमेदवारांना यामध्ये संधी देण्यात आली आहे. मनसेच्या या यादीमध्ये पुण्यातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. पुण्यातील तीन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघावर मनसेने उमेदवार जाहीर केले आहेत.
हे देखील वाचा : गुलाल नाय उधळला तर फाशी घेऊन मरेन…; ‘या’ नेत्याने दिले थेट चॅलेंज
मनसेकडून हडपसर विधानसभा मतदारसंघामधून शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि कोथरुडमधून किशोर शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचबरोबर खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार देखील मनसेने जाहीर केला आहे. खडकवासला मतदारसंघातून राज ठाकरे यांनी गोल्डमॅन रमेश वांजळे यांच्या मुलाला संधी दिली आहे. मयुरेश रमेश वांजळे यांना मनसेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुण्यातील राजकारणाला वेग आला आहे. मयुरेश रमेश वांजळे यांना उमेदवारी देऊन राज ठाकरे यांनी एकप्रकारे दिलेला शब्द पाळला आहे.
मनसेकडून खडकवासला मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतर मयुरेश रमेश वांजळे आपल्या भावना व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, मी सर्वात आधी अखंड महाराष्ट्रातील मनसैनिकांचे आराध्यदैवत राज ठाकरे यांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर हा विश्वास दाखवला, त्याला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. खडकवासल्याच्या सिंहगड किल्ल्यावर यावेळी नक्कीच शिवमुद्रा फडकणार, असा विश्वास मयुरेश वांजळे यांनी व्यक्त केला.
हे देखील वाचा : एकनाथ शिंदे यांच्या पक्षातही घराणेशाही; नेत्यांच्या भावाला, मुलाला किंवा पत्नीला उमेदवारी
कोण होते रमेश वांजळे?
पुण्यातील तडफदार आणि आक्रमक मनसे नेते म्हणून रमेश वांजळे ओळखले जात होते. त्यांच्या अंगावर सतत असणाऱ्या सोन्यामुळे त्यांना गोल्डमॅन म्हणून सुद्धा ओळखले जात होते. कॉंग्रेसमधून मनसेमध्ये आलेल्या रमेश वांजळे यांनी 2009 साली विधानसभा निवडणूक गाजवली होती. मनसेच्या उमेदवारी रमेश वांजळे हे त्यावर्षी आमदार झाले होते. रमेश वांजळे यांची लोकप्रियता फक्त पुण्यामध्ये नाही तर राज्यभरामध्ये होती. रमेश वांजळे यांचा 10 जून 2011 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर आता 13 वर्षांनी मनसेनं पुन्हा एकदा रमेश वांजळे यांच्या कुटुंबात उमेदवारी दिली आहे. त्यामुळे खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.