शहाजीबापू पाटील यांनी विधानसभा निवडणूकीनंतर निशाणा साधला आहे. (फोटो - सोसल मीडिया)
सांगोला : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे. महायुतीचे अनेक विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे देखील 45 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक प्रमुख नेत्यांसह विद्यमान मंत्र्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर बंडावेळी गुवाहाटीला गेलेल्या सगळ्या नेत्यांना संधी देण्यात आलं आहे. सांगोल्यातून पुन्हा एकदा शहाजीबापू पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुन्हा एकदा शहाजीबापू पाटील यांनी आपल्या खास शैलीमध्ये राजकीय टोलेबाजी केली आहे.
सांगोल्यामध्ये शिंदे गटाकडून पुन्हा एकदा शहाजीबापू पाटील यांना संधी देण्यात आली आहे. यावर ठाकरे गटाने जोरदार टीका केली आहे. शहाजीबापू यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आपल्या खास शैलीतून शहाजीबापूंनी टोलेबाजी केली. संजय राऊतांना देखील कडक शब्दांत त्यांनी सुनावले आहे. शहाजीबापू म्हणाले की, “संजय राऊत हा महाराष्ट्रात भुंकणारा कुत्रा आहे. माझ्याविरोधात संजय राऊत, त्याचा बाप, आजा यांनी एक नाही तर दहा सभा घेऊ देत…मी त्याला पालथा पाडून तुडवून पुढे जाऊन दाखवणार…उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाहीय. माझ्यावर टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे काही मुद्दाच नाही, असं शहाजीबापू पाटील म्हणाले. आज संजय राऊतांना सांगतो, तुम्ही सात-आठ सभा घ्या, मी विजयाचा गुलाल उधळला नाही, तर फास घेऊन मरेन,” असे विधान शहाजीबापू यांनी केले आहे.
पुण्याच्या खेड शिवापूर टोलनाक्यावर पाच कोटी रुपयांची रोकड सापडली. यावर सत्ताधाऱ्यांना घेरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली. रोहित पवार व संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटावर आरोप केले होते. यावरुन प्रत्युत्तर देताना शहाजीबापू म्हणाले की, “पैसे हे रफिक शेख यांचे होते त्यांनी ते कबूलही केले असून ते मोठे व्यापारी आहेत. त्यांचे पैसे आहेत, अशी जबाबदारी त्यांनी घेतली आहे. हे पैसे एका व्यापाऱ्याचे असताना विनाकारण एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न संजय राऊत, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार करत आहेत. रफिक भाईची श्रीमंती संपूर्ण तालुक्याला माहीत असून त्यांनी हे पैसे आपले असल्याचे सांगितल्याने आता हा विषय संपलेला आहे, पाठवलेले पैसे पाच कोटी पेक्षा जास्त असल्याचा आरोप करणारे रोहित पवार रफिक भाईंचे पैसे मोजायला गेले होते का?” असा सवाल शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी उपस्थित केला आहे.