
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूडच्या सर्वात प्रतिष्ठित फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाचा, ‘वेलकम टू द जंगल’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल, रविना टंडन आणि लारा दत्ता यांच्यासह ३० प्रमुख बॉलिवूड कलाकार आहेत. गुरुवारी मुंबईत चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, जिथे कलाकारांनी माध्यमांशी संवाद साधला.
कार्यक्रमादरम्यान, अक्षय कुमारने ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाची कथा लिहिणारे दिवंगत लेखक-अभिनेते नीरज वोहरा यांची आठवण काढली. त्याला त्याच्या मानधनाबद्दलही विचारण्यात आले. अक्षयने या चित्रपटातील कामासाठी १.७ कोटी रुपये घेतल्याचे वृत्त आहे.
यावर अक्षय म्हणाला, “ज्या कोणी तुम्हाला सांगितले की मी या चित्रपटात काम करण्यासाठी १.७ कोटी रुपये घेतले, त्यांना मी सांगू इच्छितो की मी तेवढेही घेतले नाही. हा चित्रपट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता कारण त्याची कथा नीरज वोहरा यांनी लिहिली होती. मी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, मी माझी बरीचशी विनोदबुद्धी प्रियदर्शन साहेब, राजकुमार संतोषी आणि नीरज वोहरा यांच्याकडून शिकलो. नीरजने मला खूप काही शिकवले. मी फिरोज नाडियाडवाला यांनाही ३६ वर्षांपासून ओळखतो. माझ्या संघर्षाच्या दिवसांमध्ये मी त्यांच्याकडे जायचो.”
या संभाषणादरम्यान अक्षय कुमारला त्याच्या निवृत्तीच्या योजनांबद्दलही विचारण्यात आले. अभिनेत्याने कोणताही संकोच न बाळगता मनमोकळेपणाने सांगितले, “कधीकधी मला निवृत्त व्हावेसे वाटते. पहाटे ४ वाजता जाग आल्यावर हा विचार मनात येतो. पण पाच सेकंदांनंतर मला आठवते की मला शूटिंगवर जायचे आहे, जिथे ३०० लोक माझी वाट पाहत आहेत. मग मी स्वतःला सांगतो की निवृत्तीचा विचार दुसऱ्या दिवशी करेन.” असे करत ३६ वर्षे झाली आहेत.
“मी निवृत्त झालो तर काय? मी इलेक्ट्रीशियन, डॉग वॉकर, माळी, हे सगळं होईन. त्यामुळे मला वाटते की निवृत्त होण्यापेक्षा काम करत राहणेच चांगले आहे. मी माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो. पण मग, दुसऱ्याच दिवशी ते मला विचारतात, ‘तुम्ही कामावर कधी परत जाणार?’ मला ‘निवृत्ती’ हा शब्द खूप चुकीचा वाटतो. माणसाने तेव्हा निवृत्त व्हावे जेव्हा त्याच्या मरणाला फक्त पाच सेकंद उरले असतील. जर तुम्हाला दीर्घायुष्य हवे असेल, तर काम करत राहा.”
अक्षयच्या ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास, तो २६ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. याचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले असून, आतापर्यंत त्यांची बॉक्स ऑफिस कामगिरी फारशी प्रभावी ठरलेली नाही. अक्षयचा हा मल्टी-स्टारर चित्रपट चांगली कामगिरी करतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.