सौजन्य - नवराष्ट्र टीम
शिरूर : महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी पेटवलेल्या ज्ञानदीपाचा उजेड आजही नव्या पिढीला प्रेरणा देत आहे. या महान कार्याची गाथा सांगणाऱ्या ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेत शिरूरच्या अवघ्या नऊ वर्षांच्या अनघा अश्विनी प्रसाद शिंदे हिची निवड झाल्याने शिरूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
‘जगदंब क्रिएशन’ निर्मित आणि ‘मराठी वारसा’ या यूट्यूब वाहिनीवर प्रसारित होत असलेल्या या मालिकेत अनघा सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनी माधवी थत्ते हिची भूमिका साकारत आहे. शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या त्या काळातील मुलींचे आयुष्य आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणादायी कथा या मालिकेतून उलगडणार आहे.
कठीण स्पर्धेतून झाली निवड शिरूर येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिक्षण घेणाऱ्या अनघाने कोणतेही औपचारिक अभिनय प्रशिक्षण न घेता आपल्या नैसर्गिक अभिनयाच्या बळावर ही संधी मिळवली आहे. या भूमिकेसाठी राज्यभरातील सुमारे साडेतीन हजार मुलींनी सहभाग नोंदवला होता. कठीण स्पर्धेतून निवड होऊन अनघाने आपली वेगळी छाप पाडली. खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी समाजमाध्यमांद्वारे निवड झालेल्या सहा विद्यार्थिनींची नावे जाहीर केली असून, त्यामध्ये अनघाचा समावेश आहे. अनघाचे वडील प्रसाद शिंदे हे विद्याधाम प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर आई अश्विनी शिंदे या गृहिणी आहेत.
विद्यार्थिनींना नवी प्रेरणा मिळणार
समृद्ध वारसा लाभलेल्या कुटुंबातील अनघा ही रयत शाळेतील दिवंगत शिक्षक हिंदुराव शिंदे व दिवंगत शिक्षिका शालिनी शिंदे यांची नात आहे. तसेच शिरूर नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रशांत शिंदे आणि समर्थ पॅथॉलॉजीचे उदय शिंदे यांची ती पुतणी आहे. विशेष म्हणजे, ज्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी आयुष्य वेचले, त्यांच्या जीवनकार्यावर आधारित मालिकेत भूमिका साकारण्याची संधी मिळणे हा अनघासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
“सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मालिकेत काम करण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद होत आहे. त्यांच्या कार्यामुळेच आज आम्हा मुलींना शिक्षण घेता येत आहे, अशा भावना अनघाने व्यक्त केल्या. अभिनंदनाचा वर्षाव अनघाच्या या यशामुळे शिरूर शहरासह शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ज्ञान, जिद्द आणि स्वप्नांच्या बळावर एका छोट्याशा शहरातील मुलगी आज इतिहास घडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांच्या कथेत स्वतःची भूमिका साकारत आहे, ही बाब शिरूरकरांसाठी अभिमानाची ठरत आहे. तिच्या या यशामुळे अनेक विद्यार्थिनींना नवी प्रेरणा मिळणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.






