(फोटो सौजन्य-AI एआय)
मुसळधार व संततधार पावसामुळे जिल्ह्यातील ९६ गावांना दरवषी पुराचा धोका निर्माण होतो. नद्या आणि नाल्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील ९६ गावांमध्ये पुराचा धोका वाढतो. पावसाळ्यात वैनगंगा, बाग आणि गढवी नद्यांना सतत पूर येतो, त्यामुळे अनेक गावांवर परिणाम होतो. जिल्ह्यात जिल्हा परिषद अंतर्गत जवळपास २०० हून अधिक पूल आहे.
या सर्व पुलांची उंची गेल्या क्रित्येक वर्षापासून खूप कमी आहे. त्यामुळे दर पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहत असते. वैनगंगा नदीला येणाऱ्या पुरामुळे सर्वात मोठा धोका निर्माण होतो. तिच्या काठावरील अनेक गावांना पुराचा – फटका बसतो. पुराचे पाणी रहिवाशांच्या घरांभोवती पसरते. गोंदिया तालुक्यात २४ गावे, गोरेगावमध्ये १, तिरोडामध्ये ८, अर्जुनी मोरगावमध्ये १४, आमगावमध्ये ११, सालेकसामध्ये १४, सडक अर्जुनीमध्ये १५ आणि देवरी तालुक्यात ९ गावांना पुराचा उच्च धोका असतो.
सर्वाधिक पुराचा धोका गोंदिया तालुक्यात कासा, बिरसोला, मु मुरडोरा आणि तिरोडा तालुक्यात घाटकुरोडा, चांदोरी, बिरोली आणि किडंगीपार येथे आहे. वर्षाला पावसाळयाच्या दिवसात शालेय मुले व गावकऱ्यांनाही त्रस सहन करावा लागतो. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी अपेक्षा आहे. असे संतोष शहारे, प्रशासक, ग्राम पंचायत शिवणी यांनी आपले मत मांडले आहे..
जि.प.च्या बांधकाम विभाग अंतर्गत २०० हून अधिक पूल असून, सर्वच पुलांची उंची कमी आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास सर्वच पुले पाण्याखाली येतात. त्यामुळे गावांचा संपर्क तुटतो. पावसाने विश्रांती घेतल्यास पाच तासात पुलावरून पाणी ओसरते. निधी प्राप्त होताच नवे पूल बांधकाम केले जातील, तसा प्रस्ताव शासनदरबारी पाठविण्यात आला. असे प्रकाश ताकसांडे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिप. यांनी सांगितले आहे.
पुराच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागही सज्ज असतो. अर्जुनी मोरगाव येथील पोलीस मुख्यालय आणि इतर ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येते. पूरग्रस्त गावांतील रहिवाशांना आपत्ती कशी टाळावी याबद्दल माहितीही देण्यात येते. आपत्तीला प्रतिसाद देण्यासाठी स्थानिक पातळीवर एक शोध आणि बचाव पथक तयार करण्यात येते. असे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी सांगितले.






