( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Ayushmann Khurrana : प्रसिद्ध अभिनेता आणि युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय राजदूत आयुष्मान खुराना याने महाराष्ट्रातील जालना येथे भेट देत हंगामी स्थलांतराचा परिणाम झालेल्या मुलांसाठी राबवण्यात येणाऱ्या ‘कुटुंब आणि समुदायआधारित काळजी व संरक्षण’ या युनिसेफ कार्यक्रमाची पाहणी केली. यावेळी त्याने मुलांशी, कुटुंबीयांशी आणि स्थानिक समुदायातील सदस्यांशी संवाद साधला.
आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंबांना हंगामी स्थलांतर करावं लागतं. मात्र, या स्थलांतराचा मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता असते. पालक स्थलांतरित झाल्यानंतर काही मुलं आजी-आजोबा किंवा विस्तारित कुटुंबासोबत मागे राहतात.
अशा परिस्थितीत मुलांना बालमजुरी, बालविवाह, शिक्षणात खंड, कौटुंबिक दुर्लक्ष आणि हिंसाचाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे मुलांना सुरक्षित वातावरण, शिक्षण, आरोग्यसेवा, पोषण आणि मानसिक-सामाजिक आधार मिळणं महत्त्वाचं आहे.
मुलांशी संवाद साधल्यानंतर आयुष्मान खुराना याने सांगितलं की, आर्थिक परिस्थितीमुळे होणारं हंगामी स्थलांतर अनेक कुटुंबांसाठी कठोर वास्तव आहे. मात्र, या परिस्थितीमुळे कोणत्याही मुलाला आपलं बालपण गमवावं लागू नये, असं त्याने म्हटलं.
जालन्यात स्थानिक रहिवासी स्थलांतरित पालकांच्या मुलांना संरक्षण देण्यासाठी आणि त्याने कुटुंबाशी जोडून ठेवण्यासाठी एकत्र काम करत असल्याचं पाहून आनंद झाल्याचंही खुराना याने सांगितलं. हा उपक्रम केवळ मुलांना सुरक्षित घर देत नाही, तर त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून उज्ज्वल भविष्याची आशाही देतो, असं त्याने नमूद केलं.
आयुष्मान खुराना याने शंकर आसाराम या तरुण समुदाय नेत्याचीही भेट घेतली. युवा स्वयंसेवक म्हणून केलेल्या कामामुळे शंकर याने स्थानिकांचा विश्वास संपादन केला असून, त्याची एका गावाच्या सरपंचपदी निवड झाली आहे.
तसंच त्याने बारावीत शिकणारी विद्यार्थिनी आणि बालमित्र प्रतिक्षा हिची भेट घेतली. स्थलांतराचा किशोरवयीन मुलींवर होणारा परिणाम तिने जवळून पाहिला आहे.
‘प्रत्येक मुलाला शिकण्याची संधी मिळायला हवी’
बालमित्र हे मुलांसाठी आणि स्थानिकांसाठी विश्वासार्ह आधार असल्याचं खुराना यांनी सांगितलं. मुलांचे हक्क, सुरक्षितता आणि शिक्षण यासाठी बालमित्र महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
बालमजुरी आणि बालविवाह रोखण्यासाठी तसेच मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचंही त्याने सांगितलं. बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, २०१५ ला यावर्षी दहा वर्षे पूर्ण होत असल्याचा उल्लेख करत, संरक्षणात्मक उपाय प्रत्येक मुलापर्यंत पोहोचण्याची गरज त्याने व्यक्त केली.
खुराना यांनी १८ वर्षीय शिल्पाची भेट घेतली. तिला कुटुंबासोबत हंगामी स्थलांतराचा अनुभव आहे. मात्र, तिने शालेय शिक्षण पूर्ण करून आता व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे.
शिक्षणामुळे हंगामी स्थलांतराचं पिढ्यानपिढ्या चालणारं चक्र मोडण्यास मदत होऊ शकते, अशी आशा खुराना यांनी व्यक्त केली. मुलींना योग्य, निरोगी आणि सुरक्षित वातावरण मिळाल्यास त्यांची स्वप्नं नक्की पूर्ण होऊ शकतात, असंही त्यांनी म्हटलं.
आजी-आजोबांसोबत राहणाऱ्या मुलांचीही घेतली भेट
पालकांच्या स्थलांतरानंतर आजोबा आपल्या दोन नातवंडांची काळजी घेत असलेल्या कुटुंबाचीही आयुष्मान खुराना यांनी भेट घेतली. बालमित्र आणि स्थानिकांच्या मदतीमुळे ही मुलं शाळेत जात आहेत. त्यांना आरोग्य, पोषण आणि लसीकरणासारख्या सेवाही मिळत आहेत.
आपल्या जालना भेटीबद्दल बोलताना आयुष्मान खुराना म्हणाला की, “प्रत्येक मुलाला सुरक्षित, प्रेमळ आणि पोषक कौटुंबिक वातावरणात वाढण्याचा हक्क आहे.” सरकार, युनिसेफ, महाराष्ट्र सरकार, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक नागरिक एकत्र येऊन मुलांच्या सुरक्षिततेसाठी काम करत असल्याचा अभिमान वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.
युनिसेफ इंडियाचे उप प्रतिनिधी (कार्यक्रम) यास्पर मोलर यांनीही जालना जिल्ह्यातील या उपक्रमाचं कौतुक केलं. मुलांवरील हिंसाचार रोखता येतो आणि त्यासाठी मुलांच्या आयुष्यातील धोके वेळीच ओळखून कुटुंबांना आवश्यक सेवा उपलब्ध करून देणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.
आयुष्मान खुराना आणि यास्पर मोलर यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली. यावेळी मुलं आणि कुटुंबांवर या कार्यक्रमाचा होणारा परिणाम याबाबत चर्चा करण्यात आली.






