फोटो सौजन्य - Social Media
पोलिसांकडून या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे. वैषाकच्या मृत्यूपूर्वीच्या हालचाली, त्याची मानसिक अवस्था आणि तो अभिनेत्रीच्या घरी का आला होता, याचा तपास केला जात आहे. याशिवाय अभिनेत्री कृषी थापंडा आणि वैषाकच्या नातेवाईकांचेही जबाब नोंदवले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वैषाक गेल्या काही काळापासून वैवाहिक अडचणींना सामोरा जात होता. पत्नीशी मतभेद झाल्यानंतर तो वेगळा राहत असल्याचे सांगितले जात आहे. त्याच काळात तो अभिनेत्रीच्या घरी राहत होता किंवा तेथे वारंवार ये-जा करत होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
दरम्यान, वैषाक याचे नाव यापूर्वी एका वादग्रस्त प्रकरणातही समोर आले होते. बंगळुरूतील व्यावसायिक अरविंद रेड्डी यांना कथित धमकी दिल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा गुन्हा एचएएल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
या घटनेमुळे कन्नड चित्रपटसृष्टीत आणि सामाजिक माध्यमांवर चर्चांना उधाण आले आहे. मात्र, पोलीसांनी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. सध्या आरआर नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.






