BRICS+ महोत्सवात भारतीय सिनेमाचा डंका! छाया कदम यांच्या 'स्नो फ्लॉवर'सह 'हप्पन सांगवाला'चा मोठा सन्मान
जागतिक चित्रपटविश्वात भारतीय सिनेमाने पुन्हा एकदा आपली छाप उमटवली आहे. सेंट पीटर्सबर्ग आणि मॉस्को येथे पार पडलेल्या प्रतिष्ठित BRICS+ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचा तुरा रोवला.
सिनेमातील उत्कृष्टता आणि विविध संस्कृतींना जोडणाऱ्या कथांचा गौरव करणाऱ्या या महोत्सवाला 22 देशांमधून तब्बल 327 चित्रपटांच्या प्रवेशिका मिळाल्या होत्या. 15 हून अधिक देशांतील 60 पेक्षा जास्त चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले, तर एकूण 12 पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या महोत्सवात भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘हप्पन सांगवाला’ने सर्वोत्कृष्ट फिक्शन शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला, तर भारत-रशिया सहनिर्मित ‘स्नो फ्लॉवर’ला विशेष महोत्सव पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, ‘स्नो फ्लॉवर’मधील छाया कदम आणि वैभव मांगले यांच्या अभिनयाचीही आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली.
याशिवाय, भारताच्या सांस्कृतिक उपस्थितीला आणखी बळ देत आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध तज्ज्ञ जयिता घोष यांनी आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली.
रवी यादव यांची निर्मिती असलेला ‘हप्पन सांगवाला’ हा चित्रपट नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या स्वांग या लोककलेकडे लक्ष वेधतो. या चित्रपटात ज्येष्ठ लोककलावंत हप्पन सांगी यांचा जीवनप्रवास आणि त्यांच्या कलेसाठीची धडपड उलगडण्यात आली आहे. भारताच्या समृद्ध लोकपरंपरेचा वारसा जपणाऱ्या या चित्रपटातून, आजही काही कलाकारांच्या निष्ठेमुळे आणि समर्पणामुळे जिवंत असलेल्या एका अनमोल कलेचा गौरव करण्यात आला आहे.
या सन्मानाबद्दल बोलताना रवी पिक्चर्सचे संस्थापक आणि चित्रपटाचे निर्माते रवी यादव म्हणाले, भारतीय लोकपरंपरेच्या मातीत रुजलेली आमची कथा आंतरराष्ट्रीय परीक्षकांपर्यंत पोहोचली आणि त्यांना भावली, याचा आम्हाला मनापासून अभिमान आहे. हा सन्मान चित्रपट घडवण्यासाठी पडद्यामागे आणि पडद्यावर झटलेल्या प्रत्येकाचा आहे.
तसेच क्रिएटिव्ह पॅराडाईजच्या श्वेता सिंह यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, हा चित्रपट केवळ एका लोककलेचा उत्सव साजरा करत नाही, तर ती कला आजही जिवंत ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या माणसांचाही सन्मान करतो. भारताचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या अशा कथा जगभर पोहोचवण्यासाठी हा पुरस्कार आम्हाला नक्कीच प्रोत्साहन देणारा आहे.
या महोत्सवात भारताची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी ठरला तो म्हणजे गजेंद्र अहिरे दिग्दर्शित आणि सेवन फेदर स्टुडिओजचे दीपक कुमार भगत निर्मित ‘स्नो फ्लॉवर. भारत आणि रशियाच्या संयुक्त सहकार्याने साकारलेल्या या चित्रपटाला ‘जिवंत राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाची निर्मिती आणि विविध संस्कृतींना जोडणाऱ्या खोल नात्यांचा धाडसी वेध’ घेतल्याबद्दल विशेष महोत्सव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वेगवेगळ्या देशांतील कलाकार आणि सर्जनशील समुदायांना एकाच कथेद्वारे जोडण्याची ताकद सिनेमात आहे, यावर या गौरवाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.
हा संपूर्ण टीमसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत निर्माते दीपक कुमार भगत यांनी परीक्षक मंडळ आणि महोत्सवाच्या आयोजकांचे आभार मानले. सिनेमा हा भाषा, भौगोलिक सीमा आणि सांस्कृतिक भिन्नता ओलांडून माणसांना जोडणारा प्रभावी दुवा आहे, हेच या चित्रपटाने दाखवून दिल्याचे त्यांनी नमूद केले.
दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान भारतीय आणि रशियन टीममध्ये निर्माण झालेल्या जिव्हाळ्याच्या नात्याच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, रशियन क्रूने आमच्यासोबत अगदी एकाच टीमचा भाग असल्यासारखे काम केले. केवळ सेटवरच नाही, तर गणेशपूजेसारख्या शुभ प्रसंगांमध्येही त्यांनी तितक्याच आपुलकीने सहभाग घेतला. या आपलेपणामुळेच हे सहकार्य आमच्यासाठी खऱ्या अर्थाने खास ठरले.
अभिनेत्री छाया कदम आणि अभिनेता वैभव मांगले यांच्यासाठीही हा सन्मान तितकाच खास ठरला. कोकणच्या निसर्गरम्य भूमीपासून थेट सायबेरियापर्यंतचा प्रवास जोडणाऱ्या या चित्रपटाबद्दल बोलताना छाया कदम म्हणाल्या, जबाबदारी जितकी मोठी असते, तितकीच एक अभिनेत्री म्हणून माझ्यात नवी ऊर्जा निर्माण होते. या सन्मानाबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे.
तर वैभव मांगले म्हणाले की, माझ्यासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे. हा पुरस्कार संपूर्ण टीमचा आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने दिलेल्या योगदानाशिवाय हे शक्यच झाले नसते.
भारताच्या सहभागातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध तज्ज्ञ जयिता घोष यांची आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी झालेली नियुक्ती. BRICS+ देश आणि सहयोगी राष्ट्रांतील चित्रपट निर्माते तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिनिधींसोबत त्यांनी परीक्षक मंडळाचे नेतृत्व केले. त्यामुळे सिनेमाकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन आणि कथाकथनाच्या वेगवेगळ्या शैली एकाच व्यासपीठावर अनुभवायला मिळाल्या.
या अनुभवाबद्दल बोलताना जयिता घोष म्हणाल्या, परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणे हा माझ्यासाठी अत्यंत सन्मानाचा आणि समृद्ध करणारा अनुभव होता. रशिया, भारत, इराण, क्युबा, ब्राझील, व्हिएतनाम आणि बेलारूसमधील सुंदर चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. प्रत्येक चित्रपटाची स्वतःची ओळख, स्वतःचा स्वभाव आणि स्वतःची धडधड होती. या संपूर्ण महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या टीमचे, विशेषतः अनेक महिने मेहनत घेऊन हा वैविध्यपूर्ण कार्यक्रम साकार करणाऱ्या प्रोग्रामर्सचे मी मनापासून अभिनंदन करते.
BRICS चित्रपट महोत्सवाची संकल्पना 2015 मध्ये रशियातील उफा येथे झालेल्या BRICS शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली होती. त्यानंतर 2016 मध्ये नवी दिल्लीत भारताने BRICS चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले होते. या उपक्रमामुळे आंतरराष्ट्रीय चित्रपट सहकार्याच्या दिशेने भारताची भूमिका अधिक भक्कम झाली.
Ans: ‘हप्पन सांगवाला’ आणि भारत-रशिया सहनिर्मित ‘स्नो फ्लॉवर’ या दोन भारतीय चित्रपटांना पुरस्कार मिळाले.
Ans: ‘हप्पन सांगवाला’ने सर्वोत्कृष्ट फिक्शन शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला.
Ans: गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘स्नो फ्लॉवर’ला विशेष महोत्सव पुरस्काराने गौरवण्यात आले.






