(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Dharau Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या धाटणीचे आणि आशयघन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता ग्रामीण महाराष्ट्राची पार्श्वभूमी, मातीशी जोडलेली नाती आणि गोमातेबद्दलची श्रद्धा यांचा भावस्पर्शी पट उलगडणारा ‘धाराऊ’ हा आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बुलढाणा अर्बन मीडिया हाऊस प्रस्तुत आणि मनिष सुरेश शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाचा अधिकृत पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. पोस्टरमध्ये एका निरागस चिमुकल्या मुलासोबत गाय पाहायला मिळत असून, या दोघांमधील हळवं नातं अधोरेखित होत आहे. पोस्टरमुळे ‘धाराऊ’च्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘धाराऊ’च्या पोस्टरमध्ये एका निरागस छोट्या मुलासोबत गाय पाहायला मिळते. या मुलाचा आणि गाईचा जिव्हाळा पोस्टरमधून प्रकर्षाने जाणवतो. निसर्गरम्य ग्रामीण वातावरण, गावाची पार्श्वभूमी आणि दोघांमधील आपलेपणा यामुळे चित्रपटाच्या भावविश्वाची सुंदर झलक पाहायला मिळते.
पोस्टरमधील या नात्यामुळे गोमाता, श्रद्धा, माया आणि माणुसकी या भावनांना चित्रपटात कोणत्या पद्धतीने मांडण्यात आलं आहे, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पोस्टरची रंगसंगती आणि ग्रामीण लोकेशनही चित्रपटाच्या मातीतल्या कथेला अधोरेखित करतं.
बुलढाणा अर्बन मीडिया हाऊसची निर्मिती
‘धाराऊ’ चित्रपट बुलढाणा अर्बन मीडिया हाऊस प्रस्तुत आहे. श्री. राधेश्यामजी चांडक (भाईजी), डॉ. श्री. सुकेशजी झंवर आणि सौ. कोमलजी झंवर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन मनिष सुरेश शिंदे यांनी केलं आहे. पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाच्या कथानकाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
अशी आहे तांत्रिक टीम
‘धाराऊ’च्या तांत्रिक टीममध्ये छायाचित्रण दिग्दर्शक के. विजय, संकलन मंगेश शेटके, ध्वनी मिश्रण निखिल लांजेकर आणि हिमांशू आंबेकर, वेशभूषा श्रावणी जाधव, तर मेकअप आणि हेअरस्टाईलची जबाबदारी स्नेहल कारंडे यांनी सांभाळली आहे.
चित्रपटासाठी प्रज्वल यादव आणि अभिषेक काटे यांनी संगीत दिलं असून, पार्श्वसंगीत प्रज्वल यादव यांचं आहे. गीतलेखन प्रशांत मधुपवार यांनी केलं आहे. तसेच गायक अवधूत गांधी, सन्मिता धापटे शिंदे, देवांश भाटे आणि वृषभ साठे यांनी चित्रपटासाठी योगदान दिलं आहे.
पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर ‘धाराऊ’च्या अनोख्या नात्याची आणि कथाविश्वाची चर्चा सुरू झाली आहे. ग्रामीण जीवन, मातीशी असलेलं नातं आणि माणूस-प्राणी यांच्यातील भावबंध यांची कथा चित्रपटातून कशी उलगडणार, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.
‘धाराऊ’ हा चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ पासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.






