
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या तुंबाडची मंजुळा या आगामी चित्रपटाची जोरदार सुरू आहे.खर तर ही मंजुळा दक्षिणात्या चित्रपटसृष्टीतून मराठीत आली आहे.कन्नडमधील गाजलेल्या सू फ्रॉम सो’ या चित्रपटाचा हा मराठी रिमेक असल्याची ही चर्चा सुरू आहे
चित्रपटासह या चित्रपटातील अजून एका गोष्टीची चर्चा रंगली आहे. ती म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या खास विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे मकरंद अनासपुरे यांच्या भूमिकेची. लोकप्रिय अभिनेता मकरंद अनासपुरे पुन्हा एकदा नव्या आणि लक्षवेधी अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटात ते एका साधूच्या भूमिकेत झळकणार असून, त्यांच्या या लूकची सध्या जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
मकरंद अनासपुरेंच्या लूकची जोरदार चर्चा
विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे मकरंद अनासपुरे यावेळी एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहेत. चित्रपटातील त्यांच्या गेटअपने पहिल्याच नजरेत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. लांब केस, दाट दाढी, कपाळावर ठसठशीत टिळा, गळ्यात माळा आणि अंगावर पारंपरिक वेशभूषा असा त्यांचा साधूचा अवतार पाहायला मिळत आहे.
साधूची भूमिका असली तरी त्यांच्या मिश्कील स्वभावाची आणि खुमासदार अभिनयशैलीची झलक टीझरमध्ये स्पष्टपणे दिसून येते. चेहऱ्यावरील सहज हावभाव, प्रभावी देहबोली आणि व्यक्तिरेखेतून दिसणारे गूढ व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
मकरंद अनासपुरे यांचा हा नवा अवतार प्रेक्षकांना कितपत भावतो आणि चित्रपटाच्या कथानकात त्यांच्या व्यक्तिरेखेची नेमकी भूमिका काय आहे, याची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे. त्यामुळे ‘तुंबाडची मंजुळा’ प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
आपल्या भूमिकेबद्दल मकरंद अनासपुरे म्हणतात, ‘’ ‘तुंबाडची मंजुळा’ करताना मला एक वेगळाच आणि समृद्ध अनुभव मिळाला. दिग्दर्शक विविध कोरगावकर हा नवीन असला, तरी त्याने हा चित्रपट अत्यंत संवेदनशीलतेने आणि प्रभावीपणे हाताळला आहे. या चित्रपटात मी आजवर कधीही न साकारलेली, थोडी वेगळी अशी ‘भोंदू महाराज’ ही भूमिका साकारली आहे, जी माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होती. या भूमिकेसाठीचा वेगळा लुक तयार करण्यासाठी मेकअपमॅन सचिन गिलबिले आणि कुंदन दिवेकर यांनी खूप मेहनत घेतली असून वेशभूषाकाराने दिलेल्या अनोख्या पेहरावामुळेही माझी भूमिका अधिक उठून दिसते. या लूकचं विशेष म्हणजे चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर माझ्या आईलासुद्धा साधूच्या भूमिकेत मीच आहे हे ओळखता आलं नाही. त्यामुळे हा लुक किती वेगळा आणि प्रभावी झाला आहे, याची मला जाणीव झाली. ही विनोदी भूमिका साकारण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तो प्रेक्षकांना कितपत भावतो, हे मात्र चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल.’’
चित्रपटात कलाकरांची मोठी फौज
या चित्रपटात जितेंद्र जोशी, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, रीलस्टार अथर्व रुके, नवोदित अभिनेत्री प्रियल नाईक आणि उषा नाडकर्णी हे कलाकार आहेत. ऋषिकेश तुरई यांचे लेखन असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विविध कोरगांवकर या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने केले आहे. झी स्टुडिओजतर्फे उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या ५ जून रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे