(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Colors Marathi: कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये सध्या मंगळागौरीच्या विशेष भागांची रंगत पाहायला मिळत आहे. राजगुरू वाड्यात मंगळागौरीच्या उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, पारंपरिक खेळ आणि मराठमोळ्या साजामुळे घरातील वातावरण उत्साहाने भरून गेलं आहे. शांभवी, छवी आणि घरातील इतर महिलांनी नऊवारी साड्या, पारंपरिक दागिने आणि खास साजशृंगार केला आहे. मात्र, या आनंदाच्या वातावरणात आता नाट्यमय घडामोडींना सुरुवात होणार आहे.
मंगळागौरीच्या उत्सवादरम्यान राजगुरू वाड्यात जेसिकाची अनपेक्षित एन्ट्री होणार आहे. अभिनेत्री सानिका काशीकर ही जेसिकाची भूमिका साकारणार आहे. तिच्या एन्ट्रीमुळे मालिकेच्या कथानकाला नवं वळण मिळणार असून, पुढे कोणती समीकरणं बदलणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
जेसिकाच्या भूमिकेबद्दल बोलताना सानिका काशीकर म्हणाली, “मला वाटतं हा रोल माझ्यासाठीच लिहिला गेला आहे. कलाकाराला इतक्या शेड्सचा रोल करायला मिळणं हे भाग्य आहे. मला या कॅरेक्टरवर खूप प्रेम आहे.”
जेसिकाच्या लूकबद्दलही सानिकाने उत्सुकता व्यक्त केली. “सुरुवातीपासूनच लूक, कॉस्च्युम ते मेकअप या सगळ्याची मी वाट पाहत होते, जो अतिशय क्लासी आणि कमाल-रिच असेल,” असं तिने सांगितलं.
या मालिकेतील भूमिकेबद्दल बोलताना सानिकाने एक खास आठवणही शेअर केली. तिने सांगितलं की, या भूमिकेसाठी सकाळी ८ वाजता तिला फोन आला आणि त्याच्या काही वेळ आधीच तिने आपली ‘मॅनिफेस्टेशन डायरी’ लिहून पूर्ण केली होती.
“ज्या दिवशी मला सकाळी ८ वाजता याबद्दलचा कॉल आला, त्याच्या अगदी आधीच मी माझी ‘मॅनिफेस्टेशन’ डायरी पेन बंद करून ठेवली होती. मला तेव्हा असं वाटलं की माझं मॅनिफेस्टेशन किती लवकर पूर्ण झालं,” असं सानिकाने सांगितलं.
“मला असं वाटतं एखादी गोष्ट मनापासून मागितली की ती मिळतेच. मॅनिफेस्टेशन करावं, इच्छा पूर्ण नक्कीच होतात. मला खात्री आहे प्रेक्षकांना ही भूमिका नक्कीच आवडेल,” असंही तिने म्हटलं.
शांभवी-जेसिका मिळून छवीविरोधात रचणार कट?
एकीकडे मंगळागौरीचा उत्साह सुरू असताना दुसरीकडे मालिकेत नात्यांमध्ये नवं वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. छवीला अनिकेतसमोर आपल्या मनातील भावना व्यक्त करायच्या आहेत. मात्र, तिच्या या खास क्षणात शांभवी आणि जेसिका अडथळा निर्माण करणार का, हा प्रश्न आहे.
शांभवी छवीचा आनंद हिरावून घेण्यासाठी जेसिकाशी हातमिळवणी करणार का? दोघी मिळून छवीविरोधात कोणता डाव आखणार? त्यांच्या या कटामुळे छवी आणि अनिकेतच्या नात्यात दुरावा निर्माण होणार का? या सगळ्या संकटांचा छवी सामना कसा करणार, हे आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
७ आणि ८ सप्टेंबरला विशेष भाग
‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेचे मंगळागौरीचे विशेष भाग ७ आणि ८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. जेसिकाच्या एन्ट्रीमुळे कथानकाला मिळणारं नवं वळण आणि छवी-अनिकेतच्या नात्याची पुढची दिशा जाणून घेण्यासाठी हे विशेष भाग महत्त्वाचे ठरणार आहेत. हे भाग फक्त कलर्स मराठीवर पाहता येतील.






