
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Prajakta Gaikwad wari 2026 : यंदाच्या आषाढी वारीला ७ जुलै रोजी संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानाने उत्साहात सुरुवात झाली. लाखो वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. आता आषाढी एकादशीस अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
दरवर्षीप्रमाणे पायी वारीत मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार सुद्दा सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आदेश बांदेकर आपल्या कुटुंबीयांसह 7 जुलैपासूनच वारीत सहभागी झाले आहेत. याशिवाय अभिनेत्री मराठी कश्मिरा कुलकर्णीदेखील हरिभक्तांच्या सेवेत विसावली आहे.एक नाही तर कश्मीराच्या अशा अनेक व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. मेडिकल कॉस्ट्यूम घालत अभिनेत्री तिच्या टीमसह वारकऱ्यांसाठी माउलीसेवेत तत्पर झाली आहे. रिंकू राजगुरूचा सुद्दा वारीत फुगडी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आता या पाठोपाठ मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने सुद्धा आषाढी वारीत सहभाग घेतला आहे. याचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्राजक्ता गायकवाडने शेअर केलेल्या वारीतील फोटोंनी सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कपाळावर गंध, डोक्यावर तुळशीचं वृंदावन आणि पारंपरिक वेशभूषेत ती विठ्ठलभक्तीत तल्लीन झालेली दिसत आहे. “वारी चुकायची नाही…” असं मनापासूनचं कॅप्शन देत तिने हे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले.
प्राजक्तासाठी ही वारी केवळ एक धार्मिक परंपरा नसून श्रद्धा आणि संस्कारांचा भाग आहे. विशेष म्हणजे, सध्या ती ‘पाठराखीण’ या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दैनंदिन मालिकेचं चित्रीकरण, सततचे कॉलटाईम आणि सलग तासंतास सुरू असणारं शूटिंग यामुळे कलाकारांना स्वतःसाठी वेळ काढणंही कठीण होतं.
असं असतानाही प्राजक्ताने आपल्या कामाचं नियोजन करत पंढरपूरच्या वारीत सहभागी होण्याला प्राधान्य दिलं. विठुरायाच्या दर्शनासाठी आणि वारकरी परंपरेचा अनुभव घेण्यासाठी तिने व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढला. तिच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर तिच्या साधेपणाचं, संस्कारांचं आणि विठ्ठलभक्तीचं भरभरून कौतुक होत आहे.