(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Pralhad Kudtarkar: मराठी टेलिव्हिजनवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या गाजलेल्या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला पांडू म्हणजेच अभिनेता प्रल्हाद कुर्टडकर याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रल्हादच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले असून तो बाबा झाला आहे. ही गोड बातमी अभिनेत्याने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने पत्नी अंजलीचेही मनापासून आभार मानले आहेत.
प्रल्हादने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये बाबा झाल्यानंतरच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने लिहिले, “आजवर अनेक नाती जगलो, अनेक भूमिका पार पाडल्या… आणि आता एका छोट्याशा जीवासाठी आम्ही ‘आई-बाबा’ झालो आहोत.
ज्या क्षणाची इतके महिने वाट बघत होतो, तो प्रत्येक क्षण आज कुशीत विसावला आहे. त्याच्या इवल्याशा हाताचा स्पर्श झाला आणि जाणवलं… आयुष्यभर जपावं असं काहीतरी देवाने आपल्या हातात दिलंय.”
‘त्याच्या छोट्या छोट्या स्वप्नांना बळ द्यायचंय’
बाबा झाल्यानंतर आपल्या मनात असलेल्या अनेक इच्छा आणि स्वप्नांबद्दलही प्रल्हादने या पोस्टमध्ये सांगितले आहे. चिमुकल्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अनुभवण्याची उत्सुकता त्याने व्यक्त केली. तो पुढे म्हणाला, “आता त्याच्या पहिल्या पावलांचा साक्षीदार व्हायचंय, त्याच्या बोबड्या बोलांत हरवून जायचंय, त्याच्या छोट्या छोट्या स्वप्नांना बळ द्यायचंय. त्याला मोठं करताना पुन्हा एकदा लहान व्हायचं आहे.”
पत्नी अंजलीचे मानले आभार
या आनंदाच्या क्षणी प्रल्हादने पत्नी अंजलीबद्दलही प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे. आई होण्याचा तिचा प्रवास पाहताना तिच्याबद्दलचा आदर आणखी वाढल्याचे त्याने सांगितले. “आणि या सगळ्या आनंदाचं कारण असलेल्या अंजलीचे किती आभार मानू? तिने मला आयुष्यातली सर्वात सुंदर भेट दिली आहे. आई होण्याचा तिचा प्रवास पाहताना तिच्याबद्दलचा आदर आणि प्रेम आणखी वाढलंय,” अशा भावना त्याने व्यक्त केल्या.
तसेच, “आमच्या हसण्याला, आमच्या असण्याला एक नवं कारण मिळालं आहे. आजवर प्रेम दिलंत, या नव्या प्रवासातही लोभ असावा,” असे म्हणत त्याने चाहत्यांचे प्रेम आणि आशीर्वाद मागितले आहेत.
प्रल्हादच्या या आनंदाच्या बातमीवर चाहत्यांनी आणि मनोरंजनविश्वातील चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्याच्या आयुष्यातील या नव्या प्रवासासाठी सोशल मीडियावरून अनेकजण त्याचे अभिनंदन करत आहेत.
प्रल्हाद कुर्टडकर सध्या झी मराठीवरील ‘तारिणी’ या मालिकेच्या लेखनाशी संबंधित काम करत आहे. याशिवाय, तो ‘शेवटचा कुर्ली टू वेंगुर्ला’ या चित्रपटातही दिसला होता. अभिनय आणि लेखन अशा दोन्ही क्षेत्रांत सक्रिय असलेल्या प्रल्हादच्या आयुष्यात आता आई-बाबा म्हणून नवी जबाबदारी आली आहे. त्याच्या या नव्या प्रवासासाठी चाहत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.






