( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Pehla Pyaar Doosri Baar: हिंदी सिनेसृष्टीत नव्या कलाकारांना संधी देण्यासाठी ओळखले जाणारे निर्माते लव रंजन पुन्हा एकदा सहा नव्या चेहऱ्यांना प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या आगामी ‘पहला प्यार दूसरी बार’ या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. फ्रेंडशिप-कॉमेडी जॉनरमधील हा चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘पहला प्यार दूसरी बार’च्या माध्यमातून अलीशा चोप्रा, स्पर्श वालिया, साक्षी वैद्य, कुणाल वैद्य, सरगुन कौर लूथरा आणि तुषार छिब्बर या सहा नव्या कलाकारांना ऑन-स्क्रीन लॉन्च केलं जाणार आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लुक पोस्टरमध्ये हे सर्व कलाकार एकत्र दिसत असून, त्यांच्या फ्रेश आणि स्टायलिश लूकने लक्ष वेधून घेतलं आहे.
चित्रपटाचं पोस्टर उत्साह, मैत्री आणि मस्तीची झलक दाखवतं. रंगीत आणि मॉडर्न ट्रीटमेंटमुळे पोस्टरला आकर्षक अंदाज मिळाला आहे. सहा नव्या कलाकारांना एकाच पोस्टरमधून सादर करण्यात आल्याने चित्रपटाच्या कथेबद्दल आणि त्यांच्या व्यक्तिरेखांबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
लव रंजन यांनी सांगितलं नव्या कलाकारांना लॉन्च करण्यामागचं कारण
नव्या कलाकारांना लॉन्च करण्याबद्दल लव रंजन म्हणाले, “न्यूकमर्सना लॉन्च करणे हे नेहमीच एक आव्हान राहिले आहे, पण हे असे आव्हान आहे ज्याची मला खरोखरच प्रतीक्षा असते.”
पुढे ते म्हणाले, “आजपासून पंधरा वर्षांपूर्वी ‘प्यार का पंचनामा’च्या माध्यमातून मला ही संधी मिळाली होती आणि ‘पहला प्यार दूसरी बार’च्या माध्यमातून पुन्हा एकदा अशीच संधी माझ्यासमोर आली, तेव्हा मला माहित होते की ही संधी मला सोडायची नाही.”
सहा नव्या कलाकारांसाठी एक वेगळं विश्व निर्माण करण्याचा अनुभवही त्यांनी सांगितला. “एक लेखक म्हणून सहा नव्या चेहऱ्यांसाठी एक जग निर्माण करणे आणि त्यांना त्या जगात स्वतःची रिदम शोधताना पाहणे, मला खूप आवडले,” असं लव रंजन यांनी म्हटलं.
‘पहला प्यार दूसरी बार’ या चित्रपटाचं दिग्दर्शन पदार्पण करणारे दिग्दर्शक अनुज सैनी यांनी केलं आहे. लव फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून लव रंजन आणि अंकुर गर्ग हे चित्रपटाचे निर्माते आहेत.
रिलेशनशिपवर आधारित मनोरंजक चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या लव फिल्म्सकडून आता सहा नव्या कलाकारांना घेऊन येण्यात येत असलेल्या या फ्रेंडशिप-कॉमेडीची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.






