Shivani Bawkar

‘लागीरं झालं जी’ या मालिकेच्या यशानंतर शिवानी बावकर(Shivali Baokar) पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. ४ ऑक्टोबरपासून सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या बालाजी टेलिफिल्म्सच्या 'कुसुम'(Kusum) या मालिकेत ती टायटल रोल साकारताना दिसणार आहे. या मालिकेचं औचित्य साधत शिवानीनं 'नवराष्ट्र'शी गप्पा मारल्या.

  मुंबईतील माहिम परिसरात लहानाची मोठी झालेल्या शिवानीनं ‘लागीरं झालं जी’ या मालिकेत धरलेला सातारी बोलीभाषेच्या ठेक्यानं अनेकांना तोंडात बोटं घालायला लावली. भूमिकेशी एकरूप होऊन काम करण्याची कला अंगी असलेल्या शिवानीला आजी आणि आईकडून कलेचा वारसा लाभला आहे. याबाबत ती म्हणाली की, माझं गाव अलिबाग असलं तरी गावी कधी जाणं झालं नाही. आजी-आजोबांपासून आम्ही मुंबईतच आहोत. माझी आजी त्याकाळी बीए. ऑनर इन इंग्लिश होती. त्यामुळं आमच्या कुटुंबाला शैक्षणिक वारसा असून, अभिनयाचा नाही. बावकरांकडे पुस्तकं वाचायला, नाटकं पहायला आवडतात, पण कलाक्षेत्रात कोणी नाही. याउलट आईच्या बाजूनं सांगायचं झालं तर माझी आजी गायची, आई नाटकात काम करायची, कॅालेजमध्ये असताना संस्कृत बॅले करायची. बेला शेंडे, केदार शिंदे वगैरे दिग्गजांच्या टीममध्ये आई होती. लग्नानंतर आजीनंही आईला अभिनय सुरू ठेवायला सांगितला होता, पण आईनं जॅाब आणि फॅमिली लाईफला पसंती दिली आणि पुन्हा अभिनयाकडे वळली नाही. तिच्याकडून अभिनयाचा वारसा माझ्याकडे आला.

  रुपारेल कॅालेजमध्ये अकरावीत असताना पहिल्यांदा नाटकात काम केलं, तेव्हा घरी येऊन सांगितलं की मला हेच करायचं आहे. अभ्यासात हुषार असल्यानं आधी शिक्षण पूर्ण करावं असं घरच्यांचं मत होतं. मी जरनल लँग्वेज शिकले असून, वर्षभर जॅाबही केला आहे. असं करियर सुरू असताना शनिवार-रविवारी ऑडीशन्सला जायचे. यातूनच मला ‘लागीरं झालं जी’ची संधी मिळाली. त्यांना सातारी भाषा हवी होती आणि मी कधी गावाकडची भाषा बोलले नव्हते, पण एका मित्रानं माझे फोटो पाठवले आणि प्रोडक्शन हाऊसकडून ओकेही आलं. त्यानंतर बरीच मेहनत घेत आणि वर्कशॅापच्या माध्यमातून सातारी टोन शिकले.

  क्रांतिकारी विचार मांडणारी मालिका
  ‘लागीरं झालं जी’ या मालिकेनंतर झी मराठीवरच ‘अल्टी पल्टी’ या कॅामेडी मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर बरेच विषय येत होते, पण त्यात तोचतोचपणा जाणवत होता. एखादा मेसेज देणारी मालिका आणि व्यक्तिरेखा हवी होती. ‘लागीरं झालं जी’नं देशभक्ती जागवलीच, पण त्यासोबतच आर्मीतील जवानांसोबत लग्न करण्यासाठी तरुणी तयार होत नसायच्या त्या विचारांना मूठमाती दिली. अशाप्रकारे विचार परीवर्तन करणारी मालिका हवी होती. त्यासाठी थांबले होते. अशातच ‘कुसुम’ ही मालिका आली. २००१मध्ये ही मालिका हिंदीमध्ये प्रसारीत झाली होती. मुलगी लग्न होऊन सासरी गेल्यावर तिचा पगार नवऱ्याकडेच जातो, पण यातील नायिका सासरला आपलंसं करताना माहेरची नाळही शाबूत ठेवत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणारी आहे. मुलगी सासरी गेली म्हणजे तिचं माहेरचं नातं संपलं असं होत नाही. सासरी राहूनही ती माहेरासाठी आधार ठरू शकते हा विचार या मालिकेत मांडण्यात आला आहे.

  … यामुळं लग्न ठरत नसतं
  कुसुम ही स्पष्ट बोलणारी तरुणी आहे. हिला लग्नासाठी बरीच स्थळं येतात, पण त्यांच्याकडून हिला नकारच मिळतो. यामागं एक कारण आहे. ते म्हणजे लग्नानंतर मी माझा पगार आई-बाबांना देणार हे ती सांगते. कुसुमच्या बाबांना नोकरी नाही. थोरला भाऊ घरी पैसे देत नसतो. त्यामुळं कुसुमच्या खांद्यावरच सर्व कुटुंबाची जबाबदारी असते. आयुष्यभर माझ्या आई-बाबांनी जे माझ्यासाठी केलं त्याचं ऋण केवळ दोन-तीन वर्षे जॅाब करून फेडू शकत नाही. लग्नानंतरही त्यांच्याप्रती आपलं कर्तव्य पार पडायला हवं असं तिला वाटत असतं. या विचारामुळं मात्र तिचं लग्न ठरत नसतं, पण कुसुमच्या मनाचं सौंदर्य अखेर पैशांसोबत मनाचीही श्रीमंती लाभलेल्या एका दिलदार व्यक्तीच्या नजरेस पडतं आणि तिचं लग्न होतं. त्यानंतर तिला सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्यांचा अचूक ताळमेळ साधता येतो.

  गाजलेल्या मालिकेचा मराठी रिमेक
  एखाद्या यशस्वी मालिकेचा रिमेक इतर भाषांमध्ये होतच असतो. कारण ‘लागीरं झालं जी’ या मालिकेचा पंजाबी आणि बंगालीमध्ये रिमेक झाला आहे. एका गाजलेल्या हिंदी मालिकेच्या मराठी रिमेकमध्ये काम करणं हे मला खूप आवडलंय. त्यामुळं कुसुम साकारण्यासाठी मी माझं शंभर टक्के योगदान देणार आहे. माझे विचारही अगदी कुसुमसारखेच असल्यानं मला ती खूप रिलेट होतेय. एक चाळीत राहणारी मुलगी आपल्या कृतीद्वारे समाजात वैचारीक क्रांती घडवते हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

  तिघीही खूप भिन्न
  शिवानी, शितली आणि कुसुम या तिघीही खूप वेगळ्या आहेत. शिवानी म्हणून मी घरी आणि बाहेर वेगळी आहे. मला पर्सनल लाईफ खूप शो ऑफ करायला आवडत नाही. शितलीचा स्वभाव सुरुवातीला थोडा बालिश आणि नंतर रिस्पॅान्सिबिलीटी घेणारा होता. तसा माझाही आहे. सर्वांना समजून घेऊन त्यांच्यासोबत पुढे जायला मला आवडतं. शितलीच्या वाट्याला कुणी जात नव्हतं, जर कोणी आलंच तर तो संपलाच, पण कुसुमचं असं नाहीय. हिच्या वाट्याला कुणी आलं तर आपल्या चांगुलपणानं ती समोरच्याला बदलू शकते. शितलीसारखी कुसुमही स्ट्राँग आहे, पण शितली तिचा स्ट्राँगनेस शब्दांतून आणि कृतीमधून दाखवायची. कुसुम मात्र तिचा स्ट्राँगनेस चांगुलपणातून दाखवणार आहे. चांगुलपणानंही मनं जिंकता येतात हे कुसुम दाखवणार आहे.

  दर संध्याकाळी प्रेक्षकांच्या भेटीला
  शितलीच्या गुडलकमुळं ‘लागीरं झालं जी’मधील बऱ्याच जणांनी यशाची चव चाखली. याच शितलीचं गुडलक शिवानीलाही लाभलं आहे. शितलीची भूमिका साकारल्यानंतर मला हवा तसा विषय मिळाला नसता तर मी तिचं गुडलक मानलं नसतं, पण कुसुम ही मालिका मिळणं हे शितलीचंच गुडलक असल्याचं मी मानते. कलेला कुठली भाषा नसते. मालिका हे माझं प्रेम आहे. मालिकांच्या माध्यमातून मी घराघरात पोहोचते. चित्रपटांद्वारेही मी लोकांपर्यंत पोहोचेन, पण दररोज संध्याकाळी ते मला भेटणार नाहीत. आपण जेव्हा रोज भेटतो, तेव्हा घरचे होतो. त्यामुळं मी जेव्हा लोकांना भेटते, तेव्हा त्यांना मी आपली वाटते. त्यांना मी अभिनेत्री वाटत नाही. माझ्यासाठी ते जास्त महत्त्वाचं आहे. त्यांनी मला स्वीकारावं हे मला आवडतं.

  मराठमोळं वातावरण
  या मालिकेचे एक्झिक्युटीव्ह प्रोड्युसर असलेल्या शिवकुमार यांनी बालाजीला स्पष्ट सांगितलं होतं की ‘कुसुम’ची संपूर्ण टीम मराठी असेल. निर्माते जरी हिंदीतील असले आणि मूळ मालिका जरी हिंदी असली तरी आता ती मराठीत बनवताना संपूर्ण टीम मराठी असायला हवी असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानुसार त्यांनी टीम तयार केली आणि या मालिकेला सुरुवात केली. त्यामुळं प्रोडक्शन हाऊस हिंदीतील असूनही मालिकेत मराठमोळं वातावरण आहे. कुठेही हिंदीचा फिल येत नसून, घरीच शूट करत असल्याचं जाणवतं. सुरुवातीला मालाड आणि मीरा रोडला शूट केल्यानंतर आता अंधेरीमध्ये शूट होणार आहे. या मालिकेत मोहिनीराज घटणे माझ्या बाबांच्या, तर आभा वेलणकर आईच्या भूमिकेत आहेत. राहुल मेहेंदळे आणि शिल्पा नवलकर सासरे-सासूच्या व्यक्तिरेखेत दिसतील.