सोलापूर जिल्हा परिषद (फोटो- सोशल मिडिया)
दर सोमवारी वाहन टाळून सायकल वापरण्याचा निर्णय
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांचा निर्णय
पंतप्रधानांच्या आवाहनाला देणार प्रतिसाद
सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले प्रमाणे सोलापूर जिल्हा परिषद मधील सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी दर सोमवारी वाहन टाळून सायकल वापरण्याचा निर्णय इंधन बचतीसाठी घेतला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी दिली.
युध्दजन्य परिस्थिती उदभवल्याने पेट्रोल, डिझेल व तेल यांचा वापर काटकसरीने, गरजेइतका करण्याच्या दृष्टीने तसेच जागतिक तापमान वाढ आणि वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत.
या मोहिमेचा एक भाग म्हणून सोलापूर जिल्हा परिषद मधील सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दर सोमवार हा दिवस नो व्हेईकल डे म्हणून घोषित करण्यात आला आहे.
नो व्हेईकल डे दिवशी सर्व पदाधिकारी / अधिकारी कर्मचारी यांनी आपली खाजगी दुचाकी किंवा चार चाकी वाहने कार्यालयात आणू नयेत. खाजगी तसेच शासकीय वाहनांचा वापर टाळण्यात यावा. कार्यालयात येण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, बस, सायकल, इलेक्ट्रीक वाहन किंवा पायी येण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विनंतीनुसार जबाबदारी ओळखून या विधायक उपक्रमाला सर्व पदाधिकारी अधिकारी व कर्मचार्यांकडून उत्स्फूर्त सहकार्य मिळणार असल्याचे झेडपी अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार पवार यांनी सांगितले.
पदाधिकारी टाळणार वर्षभर सोन्याची खरेदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे हा विषय ज्याच्या त्याच्या ऐपतीचा असला तरी आम्ही पदाधिकारी किमान वर्षभर सोने खरेदी न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी यावेळी सांगितले.






