संग्राम बापू भंडारे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. वारकरी संप्रदायात घुसखोरी झाल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला होता. यावेळी त्यांनी काही नावांचाही उल्लेख केला होता. याच वक्तव्याचा निषेध म्हणून संग्राम बापू भंडारे यांनी लवांडे यांच्यावर शाईफेक केली होती. अहिल्यानगरमध्ये वारकरी संप्रदायाच्या वतीने विकास लवांडे यांच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन करण्यात आले. अहिल्यानगर शहरात वारकरी संप्रदायाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत टाळ-मृदुंगाच्या गजरात आंदोलन केले. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासूनच टाळ-मृदुंगाचा निनाद करत कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर भजन आणि घोषणाबाजी करत विकास लवांडे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना निवेदन देण्यात आले. विकास लवांडे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. जर लवकरात लवकर अटक झाली नाही, तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही वारकरी संप्रदायाच्या वतीने देण्यात आला आहे. संग्राम भंडारे यांच्या शाईफेक प्रकरणानंतर आता वारकरी संप्रदाय आक्रमक झाल्याचे दिसत असून, या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.






