
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Varun Dhawan Farm: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या नव्या शेतीमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने शेती खरेदी केल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. आता वरुणने आपल्या शेतावर काम करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो चक्क शेतात उतरून काम करताना दिसत आहे. त्याचे हे फोटो पाहून चाहतेही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
वरुण धवनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो शेतात काम करताना दिसत आहे. एका फोटोमध्ये वरुण हातात फावडा घेऊन शेतात खोदकाम करताना दिसतो. तर दुसऱ्या फोटोत तो फावड्यासोबत पोज देताना दिसत आहे.
याशिवाय काही फोटोंमध्ये वरुण भातशेतात उभा राहून पोज देताना दिसत आहे. शेतातील मातीशी नातं जोडताना दिसणाऱ्या वरुणच्या या साध्या अंदाजाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
फोटो शेअर करताना वरुणने कॅप्शनमध्ये ‘शेतीची सुरुवात’ असं लिहिलं आहे.
वरुणच्या या पोस्टवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “जेव्हा तुम्ही तुम्हाला आनंद देणारं काम करता, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर असंच हास्य दिसतं.”
दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “तुम्ही इतकी वर्ष लोकांचं मनोरंजन करण्यात घालवली. आता तुम्ही तुमचं आयुष्य जगत आहात. अभिनंदन.”
तर आणखी एका चाहत्याने वरुणच्या शेतातील फोटो पाहून लिहिलं, “तुम्हाला काम करताना पाहून मला सुकून मिळत आहे.”
वरुण धवनने १९ ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत फार्म खरेदी केल्याची घोषणा केली होती. या व्हिडिओसोबत त्याने “मी एक फार्म खरेदी केला आहे” असं लिहिलं होतं.
व्हिडिओमध्ये वरुण आपल्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर करताना दिसला. “मला तुमच्यासोबत एक बातमी शेअर करायची आहे. हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं यश आहे. मी एक शेत खरेदी केला आहे. मला विचारू नका का. पण या वातावरणात इथे उभं राहून चहा आणि बिस्किटं खाणं… हे खूपच अद्भुत आहे. माझा यावर विश्वासच बसत नाही,” असं वरुण म्हणाला होता.
आता शेत खरेदी केल्यानंतर वरुण स्वतः शेतात काम करताना दिसत असल्याने त्याच्या चाहत्यांमध्येही या नव्या छंदाची चर्चा रंगली आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर वरुण धवन शेवटचा ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचं दिग्दर्शन वरुणचे वडील डेव्हिड धवन यांनी केलं होतं.
सुमारे ५५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७३.८१ कोटी रुपयांची कमाई केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, अभिनयासोबतच आता वरुणच्या शेतीच्या नव्या छंदाचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे.