फोटो सौजन्य - Social Media
डीमेंशिया हा एक गंभीर आजार असून या आजाराने पीडित व्यक्तींमध्ये मेंदूच्या कार्यक्षमतेत घट होते. याने स्मरणशक्ती तर कमी होतेच त्याचबरोबर विचार करण्याच्या क्षमतेत देखील फार मोठा उतार दिसून येतो. डीमेंशिया थेट मेंदूवर वार करत असल्याने दररोजच्या क्रियाकलापांमध्ये देखील अनेक अडचणी निर्माण होतात. जसे जसे व्यक्तीचे वय वाढते तसे तसे डीमेंशिया होण्याची शक्यताही वाढते. डीमेंशिया आधीच व्यक्तीला सावध करतो. ही लक्षणे वेळीच ओळखली तर भविष्यतील संभाव्य डीमेंशियाला रोखता येऊ शकते. डोळ्यातील काही विशिष्ट लक्षणे डीमेंशियाच्या प्रारंभिक संकेतांची ओळख देऊ शकतात.
डोळ्यांच्या हालचालीत बदल हे डीमेंशियाचे महत्वाचे लक्षण आहे. या लक्षणांमध्ये डोळ्यातील हालचाली अनियमित होणे, अंधुक दिसणे किंवा रंग ओळखण्यात अडचण येणे यांचा समावेश आहे. एकंदरीत दृष्टीक्षेपात कमीपणा येतो. डोळ्यातील लक्षणांमध्ये अचानकपणे कमी दिसणे किंवा वाचनात त्रास होणे यांचा समावेश होतो. काही वेळा, व्यक्तीला अंधारात किंवा प्रकाशात दिसण्यास अडचण येऊ शकते. डोळ्यांची तपासणी केल्यास डोळ्यांच्या मज्जातंतूंमध्ये असणाऱ्या बदलांची माहिती मिळू शकते, जी डीमेंशियाच्या प्राथमिक लक्षणांचे संकेत देऊ शकते.
डीमेंशियाचे निदान करण्यासाठी नियमित डोळ्यांची तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. डोळ्यातील बदल हे डीमेंशियाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील संकेत असू शकतात, आणि यामुळे वेळेवर उपाययोजना करण्याची संधी मिळू शकते. जर स्वतःला किंवा आपल्या परिचयातील व्यक्तींना असे काही लक्षणे दिसून येत असतील तर त्यांना वेळीच सावध करा आणि डॉक्टरांचा सल्ला घेण्यास प्रेरित करा.
डोळ्यातील कोणत्याही अनियमित बदलांकडे दुर्लक्ष न करता, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. भविष्यामध्ये होणाऱ्या डीमेंशियाचे लक्षणे ओळखणे आणि वेळेवर उपाययोजना करणे हे व्यक्तीच्या आरोग्यासाठी आणि जीवनशैलीसाठी महत्त्वपूर्ण आहे.