उन्हाचा तडाखा वाढल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे अनेकदा डिहाड्रेशनच्या त्रासाला सामोरं जावं लागतं.जसजसा उन्हाळा तीव्र होत जातो, तसतसे मूत्रमार्गाच्या समस्या तोंड वर काढू लागतात. या काळात सर्वात सामान्य समस्यांपैकी एक म्हणजे ३५ ते ५० वयोगटातील प्रौढांमध्ये मूत्रमार्गाच्या संसर्गात (यूटीआय) वाढ होते. अतिउष्णता आणि तापमानात होणारा चढउतार हे मूत्रविकार वाढण्यास कारणीभूत ठरतात. वेळीच निदान आणि उपचार केल्याने यूटीआयचे व्यवस्थापन करण्यास मदत होईल. शरीर हायड्रेटेड राखणे, चांगल्या स्वच्छता सवयींचे पालन करणे, श्वास घेण्यायोग्य सुती अंतर्वस्त्रांचा वापर करणे आणि जास्त काळ लघवी रोखून न धरणे यामुळे देखील यूटीआयची शक्यता कमी होऊ शकते.
मूत्रमार्गाचा संसर्ग (यूटीआय) हा मूत्रपिंड, मूत्रमार्ग, मूत्राशयासह मूत्रमार्गाच्या कोणत्याही भागात दिसून येतो. लघवी करताना जळजळ होणे, लघवीमध्ये फेस किंवा दुर्गंधीयुक्त लघवी, वारंवार लघवी करण्याची इच्छा होणे, लघवीत रक्त येणे, ताप येणे आणि ओटीपोटात किंवा पेल्विक भागात वेदना होणे ही याची लक्षणे आहेत. जर यूटीआयवर वेळेवर उपचार केले नाहीत तर त्यामुळे पायलोनेफ्रायटिस (किडनी संसर्ग) किंवा सेप्सिस सारखी गंभीर गुंतागुंत होऊ शकते जी जीवघेणी ठरु शकते.
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील युरोलॉजिस्ट डॉ. पवन रहांगडाले म्हणाले की, उन्हाळ्यात डिहायड्रेशन होते, ज्यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका वाढतो. जेव्हा शरीरात पुरेसे द्रवपदार्थ नसतात तेव्हा मूत्राशयातून विषारी पदार्थ आणि बॅक्टेरिया बाहेर काढता येत नाही, ज्यामुळे संसर्ग होतो. उष्ण आणि दमट हवामान देखील जीवाणू आणि जंतूंच्या वाढीसाठी एक आदर्श वातावरण तयार करते. उन्हाळ्यात, जास्त घाम येणे हे देखील बॅक्टेरियाच्या वाढीस चालना देऊ शकते. यूटीआयला कारणीभूत ठरणारा सर्वात सामान्य जीवाणू म्हणजे एस्चेरिचिया कोलाई (ई. कोलाई) बॅक्टेरिया जो आतड्यांमध्ये आढळतो, परंतु जर तो मूत्रमार्गात गेला तर तो संसर्गास कारणीभूत ठरू शकतो. महिलांना यामुळे यूटीआय संसर्गाची शक्यता असते कारण त्यांच्या मूत्रमार्गाची लांबी कमी होते, ज्यामुळे बॅक्टेरिया मूत्राशयापर्यंत सहजपणे पोहोचतात.
डॉ. रहांगडाले पुढे म्हणाले की, प्रौढांमध्ये यूटीआय संसर्गाचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे. एका महिन्यात, ३५ ते ५० वयोगटातील १० पैकी ५ रुग्णांना वारंवार लघवी होणे, लघवी करताना जळजळ होणे, लघवीवाटे रक्त येणे, ओटीपोटात दुखणे, थकवा, ताप आणि दुर्गंधीयुक्त लघवीची तक्रार करतात जे यूटीआय संसर्गांची लक्षणे आहेत. या रुग्णांना निदान करण्यासाठी आणि वेळीच उपचार सुरू करण्यासाठी मूत्र तपासणी आणि रक्त चाचण्यांचा सल्ला दिला जातो. यूटीआय टाळण्यासाठी, हायड्रेटेड राहणे, वेळोवेळी मूत्राशय रिकामे करणे, लघवी रोखून न ठेवणे, मूत्राशयावर परिणाम देणारे कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन कमी करणे आणि नाजूक भागाची चांगली स्वच्छता राखणे गरजेचे आहे.
पुण्यातील मदरहुड रूग्णालय (लुल्लानगर) प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पद्मा श्रीवास्तव म्हणाले की, उन्हाळ्यात ३५ ते ५० वयोगटातील महिला आणि १० ते १५ वयोगटातील मुलांमध्ये यूटीआयच्या प्रकरणांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ होते. डिहायड्रेशन, अस्वच्छता आणि जास्त घाम येणे यामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग होऊ शकतो. वारंवार लघवी होणे, पोटदुखी आणि ताप ही त्याची लक्षणे असू शकतात. दर आठवड्याला, मूत्रमार्गाच्या संसर्गाचे १० रुग्ण आढळतात, ज्यांना तीव्र वेदना, लघवी करताना जळजळ होणे किंवा वारंवार लघवी होणे अशी लक्षणे दिसतात. लवकर बरे होण्यासाठी वेळीच निदान आणि य अँटीबायोटिक्सचा डोस दिला जातो. हायड्रेटेड राहणे, स्वच्छता राखणे आणि जास्त वेळ लघवी रोखून न ठेवणे, सैल आणि श्वास घेण्यायोग्य सुती अंतर्वस्त्र परिधान करणे, नाजूक भागामध्ये रासायनिक उत्पादनांचा तसेच आणि परफ्यूमचा वापर टाळणे योग्य राहिल.