उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि खासदार ब्रिजभूषण सिंह यांचा मुलगा करण भूषण सिंह यांच्या ताफ्याने तीन मुलांना चिरडले. त्यातील दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एक जण गंभीर जखमी आहे.
पुण्यातीस पोर्शे प्रकरण ताजे असताना अशीच एक घटना यूपीच्या गोंडा जिल्ह्यात घडली आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा येथील कर्नलगंज लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील फॉर्च्युनर कारने दुचाकीस्वार तरुणाला चिरडले. रस्त्याच्या कडेला चालणाऱ्य एका महिलेलाही कारने उडवले. या अपघातात दुचाकी स्वाराचा 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत.
ज्या वाहनाने हा अपघात झाला त्यात कैसरगंज येथील भाजपचे उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील गाडीचा समावेश होता. या अपघातानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच लोकांचा जमाव जमला. दोन जणांचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या जमावाने स्थानिक सीएचसीला घेराव घातला. या अपघातात पोलिस एस्कॉर्ट कारचे मोठे नुकसान झाले आहे. टक्कर इतकी जोरदार होती की पोलिस एस्कॉर्ट कारच्या एअरबॅग उघडल्या. ताफ्यातील सर्वजण घटनास्थळावरून पळून गेले आहेत. ही घटना कर्नलगंज पोलीस स्टेशन हद्दीतील हुजूरपूर येथील बहराइच रेल्वे क्रॉसिंगजवळ घडली असून, घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या अपघाताने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या अपघाताची आठवण करून दिली, ज्यात भाजप नेते अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला होता. एफआयआरनुसार, चार बळींना आशिष मिश्रा यांनी चालविलेल्या वाहनाने चिरडले होते.
कोण आहे करण भूषण सिंग?
34 वर्षीय करण भूषण सिंह हा भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा धाकटा मुलगा आहे. 13 डिसेंबर 1990 रोजी जन्मलेल्या करण भूषणला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. डबल ट्रॅप नेमबाजीत तो राष्ट्रीय खेळाडू राहिला आहे. करण भूषण यांची उत्तर प्रदेश कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. करण भूषण यांचा मोठा भाऊ प्रतीक भूषण सिंग हे भाजपचे आमदार आहेत.
तसेच ब्रिजभूषण शरण सिंह हे गोंडा येथून दोन वेळा, बहराइचमधून एकदा आणि कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार आहेत. त्यांनी याआधीही समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली. ब्रिजभूषण सिंह यांनी समाजवादी पक्षाच्या तिकीटावर कैसरगंज मतदारसंघातून पहिली निवडणूक जिंकली.