काकीनाडा : आंध्रप्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात (Kakinada District) एक मोठी दुर्घटना घडली. तेल कंपनीत टॅंकरमध्ये गुदमरून सात मजूरांचा मृत्यू झाला. तर एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे. पेद्दापुरम मंडलातील रागमपेटा गावात गुरूवारी तेल कारखान्यात टॅंकरची (Oil Tanker) साफसफाई सुरू होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सकाळी साडेनऊच्या सुमारास मजुरांना तेल कारखान्यात असलेल्या टॅंकरची सफाई करण्यात सांगितले होते. रेडप्पा यांनी मॅनहोलमधून प्रथम टँकरमध्ये प्रवेश केला. काही वेळ त्याने प्रतिसाद न दिल्याने अन्य तीन मजूर टँकरमध्ये गेले. त्यांना देखील श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यांनी आरडाओरड सुरू केली, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर अन्य तीन मजूर त्यांना वाचवण्यासाठी टॅंकरमध्ये चढले. मात्र, विषारी वायूमुळे ते सर्व बेशुद्ध पडले. यानंतर आणखी एकजण खाली उतरला. त्यालाही श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला. म्हणून ते देखील आरडाओरड करू लागले. यानंतर सर्व मजुरांना बाहेर काढून जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी सहा जणांना मृत घोषित केले. उपचारादरम्यान सातव्या मजुराचा मृत्यू झाला.
10 दिवसांपूर्वीच लागले होते कामाला
मृतांमध्ये एम. रमेश (32), जी. गोविंदा स्वामी (35), बी. रामचंद्र (23), ए. रेडप्पा (30), आर. बाबू (30), अय्यम रेड्डी पल्लेक केशव (20) आणि बी. व्यंकट राजुलू (23) यांचा समावेश आहे. मृतांमधील पाचजण अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यातील पडेरूचे आहेत. तर दोघे मंडळातील पुलीमेरू गावातील आहेत. हे सर्वजण 10 दिवसांपूर्वी नोकरीवर रुजू झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तेल कारखान्याची फॅक्टरीज अॅक्टनुसार नोंदणी झालेली नाही. विषारी वायूमुळे हा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मृतांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत मिळणार
जिल्हा अग्निशमन अधिकारी व्ही. श्रीनिवास रेड्डी म्हणाले की, हॅचरीला अग्निशमन विभागाची एनओसी नव्हती. पोलिसांनी कलम 304A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) नुसार गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे, तर कंपनीने 15 लाख रुपये एक्स-ग्रेशिया देण्याचे मान्य केले आहे.






