बंगळुरू : सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात आता कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातील हिरेगे गावात एक धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन 12 वर्षे नजरकैदेत ठेवलं. पण जेव्हा पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांनी बुधवारी रात्री घरावर छापा टाकून पीडितेची सुटका केली.
म्हैसूर जिल्ह्यातील हिरेगे गावातील ही घटना आहे. एक व्यक्ती त्याच्या पत्नीवर लग्नाच्या दिवसापासूनच संशय घेत होता. याच संशयातून लग्नाच्या पहिल्याच आठवड्यात त्याने तिला घरातील एका खोलीत कोंडून ठेवले होते. तिचा त्याने छळ सुरु केला. आपली पत्नी कोणाशी बोलू नये म्हणून त्याने दाराला तीन कुलूप लावली आणि पत्नीला कोणाशीही बोलू नकोस असे बजावले. तसेच तिला घराबाहेरील टॉयलेटचा वापर करण्यास मनाई केली. यासाठी आरोपी खोलीत बादली ठेवून त्याची विल्हेवाट लावत असे. या सर्व प्रकाराला कंटाळलेल्या पीडितेच्या नातेवाईकाने पोलिसांना घटनेची माहिती दिली.
छापा टाकून केली पीडितेची सुटका
एएसआय सुभान, वकील सिद्धप्पाजी आणि सामाजिक कार्यकर्त्या जशीला यांच्या पथकाने घरावर छापा टाकून पीडितेची सुटका केली. आरोपी पतीने पत्नीला धमकी दिली होती की, जर ती घराबाहेर पडली किंवा कोणाशी बोलण्याचा प्रयत्न केला तर तो तिचे काहीतरी बरे वाईट करेन.