आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत (फोटो - istockphoto)
राज्यात जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी
अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान,
आपद्ग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना रुपये चार लाख
मुंबई: राज्यात जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी, पूर आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 251 तालुके पूर्णतः तर 31 तालुके अंशतः आपत्तीग्रस्त/अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करून आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज आणि विविध सवलती लागू केल्या आहेत. तसेच आपद्ग्रस्त तालुक्यातील बाधितांना दुष्काळ सदृश परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान, शेतजमीन वाहून जाणे, घरांची पडझड, जनावरांची हानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या सर्व आपद्ग्रस्तांना तातडीने दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाने हे विशेष पॅकेज लागू केले आहे. या विशेष पॅकेजमुळे बाधित पिके, शेती, घरे, जनावरे, मत्स्यव्यवसाय, पायाभूत सुविधा दुरुस्तीस मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.
जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित 251 पूर्णतः व 31 अंशतः बाधित तालुक्यातील बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात आले. जून ते ऑगस्ट 2025 या कालावधीत 26.69 लाख हेक्टर तर सप्टेंबर 2025 मध्ये जवळ जवळ 39 लाख हेक्टर अशा सुमारे 65 लाख हेक्टर क्षेत्रावरील शेत पिकांचे नुकसान झाले असल्याचेही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले.
आर्थिक साहाय्य – आपद्ग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना रुपये चार लाख, अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास 40 ते 60 टक्के अपंगत्व आल्यास रुपये 74 हजार, 60 टक्के पेक्षा अधिक अपंगत्व आल्यास 2 लाख 50 हजार, जखमी व्यक्ती रूग्णालयात एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी दाखल झाला असल्यास 16 हजार, एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी दाखल असल्यास 5 हजार 400 रुपये.
घरांसाठी मदत – पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या /कच्च्या घरांसाठी- सपाट भागातील प्रती घर रुपये 1 लाख 20 हजार तर डोंगराळ भागातील घरांसाठी 1 लाख 30 हजार, अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी (किमान 15 टक्के) पक्क्या घरांसाठी प्रती घर 6 हजार 500 रुपये, कच्च्या घरांसाठी प्रती घर चार हजार रुपये, प्रती झोपडी आठ हजार रुपये, प्रती गोठा तीन हजार रुपये.
मृत जनावरांसाठी – दुधाळ जनावरांसाठी प्रती जनावर 37 हजार 500 रुपये, ओढकाम करणाऱ्या जनावरासाठी प्रती जनावर 32 हजार रूपये, लहान जनावरासाठी प्रती जनावर 20 हजार रूपये, शेळी मेंढी प्रती जनावर चार हजार रुपये आणि प्रती कोंबडी 100 रुपये.
शेतीपिकांचे नुकसान – प्रति हेक्टर 8 हजार 500 रुपये (तीन हेक्टर मर्यादेत), आश्वासित सिंचनाखालील (बागायत) पिकासाठी प्रती हेक्टर 17 हजार (तीन हेक्टर मर्यादेत), आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रती हेक्टर 22 हजार 500 रुपये (तीन हेक्टर मर्यादेत).