संग्रहित फोटो
कोल्हापूर : चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांच्याशी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून एका अज्ञात महिलेने त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आमदार शिवाजी पाटील यांनी दीड महिन्यापूर्वी ठाणे पोलीस आयुक्तालयात तक्रार दाखल केली होती. चौकशीअंती चितळसर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या दीड वर्षापासून हा प्रकार सुरू असून अज्ञात महिलेने विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदारांशी व्हाट्सअप वरून वारंवार संपर्क साधून त्यांना अश्लील फोटो व्हाट्सअपवर पाठवले त्यानंतर तिने आमदारांकडे पैसे मागण्यास व ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली. दरम्यान आमदार पाटील यांनी सदर महिलेचा मोबाईल नंबर ब्लॉक करून टाकला होता. तरीसुद्धा या महिलेने अनेक वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधून ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुरूच ठेवला होता. यादरम्यान या महिलेने वेळोवेळी पैशाची मागणी करत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची आमदारांना धमकी दिली होती.
या हानी ट्रॅप प्रकरणात संशयित म्हणून चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावातील एका २५ वर्षीय तरुणाचा समावेश असल्याचे सांगितले जाते. या तरुणाला चंदगड पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे.
या महिलेने आमदार शिवाजी पाटील यांच्याबरोबरच राज्यातील अनेक आमदार आणि लोकप्रतिनिधींना हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. सदर महिला आमदार व इतर राजकीय नेत्यांना हेरून त्यांच्याशी अश्लील चॅटिंग करत होती. त्यानंतर त्यांचे व्हिडिओ व फोटो पाठवून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचे प्रयत्न केले आहेत, अशी माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे.