(Photo - Social Media)
जंतरमंतर आंदोलनानंतर चर्चेत आलेले कॉक्रोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी शिक्षण, बेरोजगारी, न्यायव्यवस्था आणि देशातील राजकीय वातावरणावर भाष्य करत पक्षाच्या आगामी वाटचालीची रूपरेषा जाहीर केली आहे. संभाजीनगर येथे दोन दिवसांच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ नावाने राष्ट्रव्यापी जनसंवाद अभियान सुरू करण्याची घोषणा केली.
अभिजीत दिपके यांनी सांगितले की, अनेकांना CJP म्हणजे नेमका कोणता पक्ष, असा प्रश्न पडला आहे. त्यांच्या मते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या संविधानिक मूल्यांवर आणि लोकशाहीच्या विचारांवर पक्षाची वाटचाल असेल. पक्ष धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवत असून संविधान हेच आपले मार्गदर्शक तत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘क्या बोलती पब्लिक’ या मोहिमेअंतर्गत देशभर दौरे करून नागरिकांच्या अपेक्षा, समस्या आणि चिंता समजून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण आणि बेरोजगारीसारख्या मूलभूत प्रश्नांवर पुरेशी चर्चा होत नसल्याची टीका करत त्यांनी, संसदेतही या विषयांवर अपेक्षित गांभीर्याने चर्चा होत नसल्याचा दावा केला.
शिक्षण व्यवस्थेबाबत बोलताना दिपके म्हणाले की, आज उच्च शिक्षण घेणे अनेक कुटुंबांसाठी आर्थिकदृष्ट्या कठीण झाले आहे. शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यावे लागते आणि त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर आर्थिक ओझे वाढते. शिक्षण व्यवस्था अधिक परवडणारी आणि सर्वांसाठी उपलब्ध व्हावी, यासाठी व्यापक बदलांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
बेरोजगारी हा देशासमोरील सर्वात गंभीर प्रश्न असल्याचे सांगताना त्यांनी युवकांच्या रोजगाराच्या संधींबाबत चिंता व्यक्त केली. “प्रत्येक तरुणाचे स्वप्न डिलिव्हरी बॉय होणे नसते,” असे म्हणत त्यांनी गुणवत्तापूर्ण रोजगारनिर्मितीवर भर देण्याची गरज व्यक्त केली. जंतरमंतर आंदोलनात केवळ विद्यार्थीच नव्हे, तर रोजगाराच्या प्रश्नाने त्रस्त असलेले अनेक युवक सहभागी झाल्याचा दावाही त्यांनी केला.
याशिवाय, माध्यमे आणि न्यायव्यवस्थेबाबतही त्यांनी आपली मते व्यक्त केली. न्याय मिळण्यात होणारा विलंब, लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास आणि समाजातील वाढत्या असंतोषाचा उल्लेख करत त्यांनी लोकांशी थेट संवाद साधण्याची गरज अधोरेखित केली. दरम्यान, अभिजीत दिपके यांनी मांडलेली भूमिका ही त्यांच्या पक्षाची राजकीय भूमिका असल्याचे स्पष्ट केले असून, शिक्षण, रोजगार आणि संविधानिक मूल्ये हे आगामी काळात CJPच्या अभियानाचे प्रमुख मुद्दे असतील, असे त्यांनी सांगितले.






