जरांगे पाटलांच्या भेटीवरून लक्ष्मण हाके संतापले
Laxman Hake : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आज 14 दिवस पूर्ण झाले आहेत. सलग उपोषणामुळे जरांगे यांची तब्येत खालावली असून मराठा आरक्षणाचा लढा आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. अशातच उद्या अंतरवाली सराटीत मराठा बांधवांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईतील आंदोलनाबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्यानंतर सीजेपीचे अभिजीत दीपके यांनी त्यांची भेट घेतली. मात्र, या भेटीवरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके चांगलेच संतापले आहेत. हाके यांनी दीपकेंवर जोरदार शब्दांत टीका करत त्यांना थेट इशाराही दिला आहे.
माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, अभिजीत दीपके अजून बच्चा आहे, छोटासा कार्यकर्ता आहे. ते अमेरिकेतून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जातवास्तव आणि जात वर्चस्वाची परिस्थिती त्यांना पूर्णपणे माहिती नाही. आधी त्यांनी अभ्यास वाढवावा आणि दलित चळवळीचा अभ्यास करावा, असा टोला हाकेंनी लगावला.
“मनोज जरांगे यांना पाठिंबा देणे म्हणजे जात वर्चस्वाला पाठिंबा देणे,” असा आरोपही हाकेंनी केला. जरांगे यांच्या भाषाशैलीवरूनही त्यांनी दीपकेंना सवाल केला.
अभिजीत दीपके यांनी सोनम वांगचुक आणि मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात केलेल्या भूमिकेवरूनही हाकेंनी जोरदार टीका केली. एका बाजूला पद्मश्री पुरस्कारप्राप्त, आयआयटी इंजिनीअर आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक, तर दुसऱ्या बाजूला जरांगे यांची तुलना कशी होऊ शकते, असा सवाल त्यांनी केला.
“अभिजीत दीपके अभी तो बच्चा है, सामाजिक न्याय के बारे में वो कच्चा है,” असं म्हणत हाकेंनी दीपकेंना सामाजिक प्रश्नांचा अधिक अभ्यास करण्याचा सल्ला दिला.
शिक्षण आणि भ्रष्टाचाराविरोधातील भूमिकेला आपण पाठिंबा दिला असल्याचं हाके म्हणाले. मात्र, झुंडशाहीची भाषा करणाऱ्या जरांगे पाटलांच्या नादी लागू नये, असा सल्लाही त्यांनी दीपकेंना दिला.
यापुढेही दीपके यांनी वारंवार जरांगे यांच्या समर्थनाची भूमिका घेतली, तर “त्यांनाही आम्ही सोडणार नाही,” असा थेट इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता मराठा-ओबीसी संघर्षाचा राजकीय वाद पुन्हा तापण्याची शक्यता आहे.






