बिहारमध्ये NDA चं टेन्शन वाढलं! ओवेसींचा पक्ष महाआघाडीत सामील होणार
बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी महाआघाडीत सामील होण्याचे संकेत दिले आहेत. बिहारमधील कॉंग्रेस-आरजेडीच्या महाआघाडीतील नेत्यांशी संपर्क साधला असून भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
रविवारी पत्रकारांशी बोलताना ओवैसी म्हणाले की, “आमचे बिहार प्रदेशाध्यक्ष अख्तरुल ईमान यांनी महाआघाडीतील काही नेत्यांशी चर्चा केली असून आम्ही NDA ला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्याचा निर्धार केला आहे. आता महाआघाडीच्या नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे. आमची सहकार्य करण्याची पूर्ण तयारी आहे.”
तथापि, ओवैसी यांनी हेही स्पष्ट केलं की, जर महाआघाडीने त्यांना सामील करून घेतलं नाही, तरी AIMIM सर्व जागांवर स्वबळावर लढण्यास तयार आहे. “ते तयार नसतील, तरी आम्ही प्रत्येक मतदारसंघातून निवडणूक लढवू. योग्य वेळी जागांची घोषणा करू,” असंही त्यांनी सांगितलं.
ओवैसी यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. त्यांनी बिहारमध्ये सुरू असलेल्या ‘स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन’ मोहिमेवर शंका उपस्थित करत याला “बेकायदेशीर” ठरवले. “ही मोहिम म्हणजे बिहारमध्ये NRC मागच्या दाराने लागू करण्याचा प्रयत्न आहे,” असा आरोप त्यांनी केला. मतदारांची जन्मतारीख, जन्मस्थान आणि त्यांच्या पालकांची माहिती मागवली जात असल्यामुळे गरिबांचा नामावलीतून वगळण्याचा धोका असल्याचे ते म्हणाले.
AIMIM ची सीमांचल भागात मजबूत पकड आहे. 2020 मध्ये पक्षाने पाच जागा जिंकत दमदार प्रवेश केला होता. जरी त्यांपैकी चार आमदार नंतर RJD मध्ये सामील झाले, तरी AIMIM चं मुस्लिमबहुल भागांतील प्रभाव टिकून आहे. महाआघाडीत सामील झाल्यास मुस्लिम मतांचं विभाजन थांबेल आणि विरोधकांचे संख्याबळ वाढू शकते. याचा थेट फटका NDA ला, विशेषतः भाजपला बसू शकतो.
PM Modi : ‘ट्रॅकोमा’ भारतातून हद्दपार, WHO, ILO कडून कौतुक; मन की बातमध्ये PM मोदींनी दिली माहिती
दुसरीकडे, जर AIMIM ला महाआघाडीत स्थान मिळालं नाही, तरीही ओवैसींचं स्वतंत्र लढणं NDA साठी धोका ठरू शकतं, कारण ते मुस्लिम मतं विभाजित करू शकतात. त्यामुळे बिहारच्या राजकारणात नवा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Oवैसी यांच्या भूमिकेमुळे येत्या काळात सत्तासमीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलू शकतात.